सोलापूर -करमाळा तालुक्यातील चिखलठाण येथील कांदा उत्पादक शेतकऱ्याला एकवीस गोणी कांदा विकल्यानंतर चक्क कांदा घेणाऱ्या आडत्यालाच १३३ रुपये देण्याची वेळ आली आहे. त्याचा उत्पादन खर्च देखील निघाला नाही. उलट जवळचे पैसे गेले. निसर्गाने अन्याय तर केलाच मात्र, व्यापाऱ्यांनीही आपला सूड उगवल्याने शेतकरी वर्गामध्ये संतापाची लाट उसळली आहे.
गेल्या आठवड्यात कांद्याला ४० रुपये दर मिळाल्याने शेतकरी वर्गाला मोठा आनंद झाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा विकण्यासाठी गर्दी केली होती. करमाळा येथील शेतकरी राहुल गव्हाणे यांनी आपल्या शेतातील एकवीस गोणी कांदा बाजारसमितीमध्ये विकण्यासाठी आणला होता. कांद्याला चांगला दर मिळाला, तर ते गावाकडे जाताना सोलापूरवरून कुटुंबीयांसाठी कपडे घेऊन जाणार होते. मात्र, कांद्याची पट्टी त्यांच्या हातात मिळाली आणि त्यांना धक्काच बसला. त्यांचा कांदा २ रुपये किलो दरापेक्षा जास्त दराने विकू शकला नाही. ३ गोण्या तर फुकटच द्याव्या लागल्या. मात्र, गाडीचे भाडे, हमाली, तोलाई, वारणी असा इतर खर्च १ हजार ४७६ रुपये झाला. मात्र, २१ गोणी कांद्यापासून त्यांना फक्त १ हजार ३४३ रुपये मिळाले. बेरीज वजाबाकीचे गणित झाल्यानंतर त्यांना स्वत: जवळचे १३३ रुपये आडत दुकानदाराला देण्याची वेळ आली. मात्र, दुकानदाराने शेतकऱ्याकडून पैसे घेतले नाही. तरीही मी कांद्याचे उत्पादन का घेतले? हा प्रश्न सतत गव्हाणे यांना सतावत होता.