सोलापूर- कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापाऱ्यांनी कांद्याचा दर पाडल्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत. २० हजार रुपये प्रति क्विंटल कांदा विक्रीची बातमी माध्यमातून तसेच सोशल मीडियायात मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली होती. त्यामुळे कांद्याची आवक वाढली आणि कांद्याच्या दरात घट झाली. मात्र, दर कमी होण्यामागे व्यापाऱ्यांचा हात असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्याचबरोबर, शेतकऱ्यांनी याबाबत मीडियावरही आगपाखड केली आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी सरासरी ६ ते ८ हजारापर्यंत विकला गेलेला कांदा शनिवारी मात्र ४ ते ५ हजार रुपये प्रति क्विंटल दराने विकला गेला. सोलापूर बाजारात कांद्याची आवक मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळे व्यापाऱ्यांनी कांद्याचे दर पाडल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. तसेच सोलापुरात २० हजार रुपये प्रति क्विंटल एवढा कांदा विक्रीस गेल्याच्या बातम्या माध्यमातून तसेच सोशल मीडियातून पसरल्या. त्यामुळे कांद्याचे दर पडले असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी माध्यम आणि सोशल मीडियावरही आग पाखड केली.