सोलापूर :चेन्नई सुरत ग्रीनफिल्ड महामार्ग बाधित शेतकऱ्यांना कमी नुकसान भरपाई जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी अक्कलकोट तहसील कार्यालयासमोर चूल मांडून शासनाचा निषेध केला आहे. चेन्नई-सुरत ग्रीनफिल्डच्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अधिक नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
चेन्नई सुरत महामार्गावर योग्य मोबदल्याची मागणी :सोलापुरात चेन्नई सुरत ग्रीनफिल्ड महामार्गावर बाधित झालेल्या शेतकऱ्यांना दिला जाणारा मोबदला अत्यल्प आहे. सोलापूर जिल्ह्यात इतर महामार्गावर बाधित शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळाला आहे. इतर शेतकऱ्यांप्रमाणे चेन्नई सुरत ग्रीनफिल्ड महामार्ग बाधित शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा. यासाठी शुक्रवारी अक्कलकोट तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी जोरदार निदर्शने केली.
आंदोलनामुळे धांदल उडाली : शेतकऱ्यांनी अक्कलकोट तहसील कार्यालयासमोर अचानक उपोषण सुरू केल्याने तहसील कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये धांदल उडाली होती. माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनीही शेतकऱ्यांसह उपोषणाला पाठिंबा दर्शवला आहे. त्यानंतर तात्काळ अक्कलकोट पोलिसांना आंदोलनाची माहिती देण्यात आली. तहसील कार्यालयासमोर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.