सोलापूर- रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गवर कामासाठी कुरुल(ता मोहोळ,जि सोलापूर) येथील पाझर तलाव नं.१ व नं. ६ येथून मुरूम उचलण्यासाठी राज्य सरकारकडून दिलीप बिल्डकॉन कंपनीला मुरूम उपसाची परवानगी मिळाली होती. मात्र नियमापेक्षा जास्त व जास्तीची खोली झाल्याने तलावचे प्रचंड नुकसान झाले आहे. तलावाचे भवितव्य धोक्यात आल्याने संतप्त ग्रामस्थांनी शुक्रवारी कुरुल चौकात राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करून प्रशासनाला धारेवर धरले.
तलावातुन होणारा पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे तलावाखाली असलेल्या सुमारे ५०० एकर शेतीच्या क्षेत्राला फटका बसत आहे. जनावरांची व नागरिकांची पाण्याची भटकंती वाढल्याचे पंचायत समितीचे सदस्य जालिंदर लांडे यांनी सांगितले.
संतप्त शेतकऱ्यांनी तलावातील मुरुम उपशाचे काम बंद पाडले-
स्थानिक प्रशासनाकडुन व जिल्हा प्रशासनाकडून कोणतीच दखल घेतली नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी तलावातील मुरुम उपशाचे काम बंद पाडले आहे. शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतल्यामुळे मोहोळ तालुक्यातील कुरुल येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून सोलापूर रत्नागिरी महामार्गावर शेतकरी डीबीएल कंपनीविरोधात आंदोलन करत आहेत.
500 एकर शेतीचे नुकसान-
कुरुल पाझर तलाव क्र.१ मधून मुरुम उपशासाठी शासनाकडुन दिलीप बिल्डकॉन कंपनीला ६२ हजार ब्रासची व जमिनीपासून ३ मिटरची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, गेली ४ महिने या तलावातुन मुरुमाचा बेसुमार उपसा सुरू आहे. सुमारे दीड लाख ब्रास व १५ ते २० मीटर खोदाई झाली आहे. यामुळे तलावाला धोका निर्माण झाला आहे. भविष्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला. तर त्यामध्ये पाणी राहणारच नाही. परिणामी तलावाखाली असणाऱ्या सुमारे ५०० एकर शेतीत दलदल झाल्याशिवाय राहणार नाही.