महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Aug 22, 2019, 7:07 PM IST

ETV Bharat / state

सोलापुरात पीक विम्यासाठी शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन

बार्शी तालुक्यातील नारी व परिसरातील शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून अजूनपर्यंत नुकसान भरपाई मिळालेली नाही.

सोलापुरात पीक विम्यासाठी शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन

सोलापूर - बार्शी तालुक्यातील नारी व परिसरातील गावातील शेतकऱ्यांनी पीक विम्याची रक्कम मिळत नसल्यामुळे आज (गुरुवारी) विमा कंपनीच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. खरीप हंगामातील पिक विमा भरुन देखील भरपाई मिळत नसल्यामुळे हे आंदोलन केले, अशी माहिती या शेतकऱ्यांनी दिली.

शेतकऱ्यांचे विमा कंपनीच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन

बार्शी तालुक्यात खरीपाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. तालुक्यातील शेतकऱ्यांनी २०१८ या वर्षातील खरीप हंगामासाठीचा पीक विमा भरलेला आहे. मागील वर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे तालुक्यातील खरीपाचे पीक पूर्णपणे वाया गेल्यामुळे शेतकऱ्यांच्या हाताला काहीच आले नाही. त्यामुळे शासन दरबारी पंचनामे देखील झाले. पंचनामे झाल्यानंतर शासनाने जाहीर केलेली मदत तालुक्यातील काही शेतकऱ्यांना मिळाली. शासनाच्या मदतीसोबत विमा कंपनीचीही मदत मिळाली. मात्र, नारी व परिसरातील शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून अजूनपर्यंत नुकसान भरपाई मिळालेली नाही.

मागील ३ महिन्यापासून हे शेतकरी विमा कंपन्याच्या कार्यालयात चकरा मारीत आहेत. मात्र, कंपनीकडून या शेतकऱ्यांनी कोणतीच दाद दिली जात नाही. शेतकऱ्यांनी विमा भरताना जो अर्ज भरला त्यात चुकीची माहिती दिल्यामुळे त्यांना नुकसान भरपाई दिली जात नसल्याचे कंपनीकडून सांगण्यात येत आहे. मात्र, वास्तविक पाहता विमा भरताना शेतकऱ्यांकडून चूक झाली असली तरीही मागील अनेक महिन्यापासून हे एकमेव कारण पुढे करुन विमा देण्यास चालढकल केली जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

शेतकरी हे त्यांनी भरलेल्या विम्याच्या पोटी नुकसान भरपाई मागत आहेत. पण विमा कंपनीकडून या शेतकऱ्यांचे समाधान करुन मदत देण्याऐवजी शेतकऱ्यांना संभ्रमात ठेऊन विनाकारण चकरा मारायला लावत आहे. त्यामुळे आज शेतकऱ्यांनी विमा कंपनीच्या कार्यालयातच आपला ठिय्या मांडला. तसेच जोपर्यंत नुकसान भरपाई मिळत नाही, तोपर्यंत कार्यालयातून उठणार नाही, अशी भूमिका घेतली. सध्या विमा कंपनीकडून आश्वासन मिळाल्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details