सोलापूर- अकलूज जवळील बागेचीवाडी येथील शेतकऱ्याने पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी दक्षिण भारत भ्रमंती करून नऊ दिवसात तीन हजार दोनशे किलोमीटर अंतर पार केले आहे. मोतीराम वाघ या शेतकऱ्याने आपला मुलगा समाधान वाघसह पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी एक तरी झाड लावा, असा संदेश देत अकलूज ते कन्याकुमारी व परत अकलूज असा प्रवास दुचाकीवर पूर्ण करत हे अंतर पार केले आहे.
करमाळा: पर्यावरणासाठी शेतकऱ्याची मुलासह दुचाकीवरून दक्षिण भारत भ्रमंती - travelers of maharashtra
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी एक तरी झाड लावा, असा संदेश देत अकलूज ते कन्याकुमारी व परत अकलूज असा प्रवास दुचाकीवर पूर्ण करत मोतीराम वाघ या शेतकऱ्याने आपला मुलगा समाधान वाघसह दक्षिण भारत भ्रमंती करून नऊ दिवसात तीन हजार दोनशे किलोमीटर अंतर पार केले आहे.
रोज सकाळी लवकर उठून दुचाकीवर भ्रमंती सुरु करत लोकांना पर्यावरणाच्या समतोलासाठी पुढील पिढीकरिता एक झाड लावा, असा आग्रह करून पुढील प्रवासाला निघायचे. रात्र झाली की जिथे असेल तेथेच मुक्काम करायचा. दिवस उजाडला की पुन्हा भ्रमंती सुरु. असा तब्बल नऊ दिवस रोज 400 किलोमीटरचा प्रवास करत दक्षिण भारत भ्रमंती केली. मोतीराम वाघ यांनी अभियानात पुढची पिढी म्हणजे स्वतःचा मुलगा समाधान यास सहभागी केले. दिवाळीच्या सुटीत मामाच्या गावी जाण्यापेक्षा आपल्या वडिलांसोबत दक्षिण भारत फिरणे त्याला रोमांचकारी वाटले. प्रवासादरम्यान तामिळनाडू, आंध्रप्रदेश, कर्नाटक, केरळ आदी विविध राज्यांतील बोली भाषा अनुभवत आपल्या मोडक्यातोडक्या हिंदी, इंग्रजीतून आपले म्हणणे पटवून देताना वेगळाच अनुभव घेता आल्याचे वाघ यांनी सांगितले.
वाघ यांनी आपल्या अभियानास अकलूज येथून सुरूवात करून सातारा, कोल्हापूर, बेळगाव, धारवाड, हुबळी, दावणगिरी, चित्रदुर्ग बेंगलोर, सैलम, तिरुपती, चैनई, मदुराई,तिरुचिरापल्ली, कन्याकुमारी येथून परत त्रिवेंद्रम, ओलाम,कोचीन, पालघर,कोईमतूर, म्हैसूर, उटी, बेंगळूर, कोल्हापूर, अकलूज असा सुमारे तीन हजार 200 किलोमीटचा प्रवास केला. आपल्या भ्रमंतीमुळे त्या भागाची भौगोलिक,सांस्कृतिक प्रथा परंपरा आदींची माहिती मिळते व त्याचा आपणाला आनंद मिळत असल्याचे मोतीराम वाघ यांनी सांगितले.