सोलापूर - मोहोळ तालुक्यातील शिरापूर येथील एका शेतकऱ्याने गांजाची शेती करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आज (26 ऑगस्ट) निवेदनाद्वारे मागणी केली आहे. तसेच सकून गायकवाड यांनीदेखील यापूर्वी टोमॅटोला मिळालेल्या भावाला कंटाळून गांजाचे पीक पिकवण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी केली होती.
शेतकऱ्यांना कधी कोणते पीक आर्थिक लाभ मिळवून देईल तर कधी कोणते पीक डोळ्यात अश्रू आणेल हे काही सांगता येत नाही. सोलापूर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात राबून टोमॅटो पिकाची लागवड केली. परंतु, त्याच पिकाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आणले आहेत. जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकरी टोमॅटोच्या पिकाने अडचणीत आला आहे. बाजारात टोमॅटोची विक्री कवडीमोल दराने होत असल्याने मार्केटमधून घराकडे येत असताना अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटो रस्त्याच्या कडेला फेकून दिल्याचे पाहायला मिळाले.
- सोलापुरात टोमॅटोचे दर कोलमडले-
सोलापूर जिल्ह्यात टोमॅटोची लागवड जास्त प्रमाणात झाली आहे. या टोमॅटोच्या पिकाला चांगला भाव येईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. परंतु, शेतकऱ्यांच्या या आशेवर पाणी फिरले आहे. बाजारात या टोमॅटोची विक्री ३ ते ४ रुपये किलो दराने होत असल्याने शेतकरी वर्गातून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटो बाजारात न विकताच घराकडे परत आणत असताना रस्त्याच्या कडेला हजारो टन टोमॅटो फेकून दिली आहेत.
- गांजा पिकाची लागवड करण्याची शेतकऱ्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी -
शेती पिकाला हमी भाव नसल्याने शेतकरी पूर्ण अडचणीत सापडला आहे. सोलापूरच्या एका शेतकऱ्याने गांजा पिकाची लागवड करण्याची परवानगी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे मागितली आहे. शेतकऱ्याच्या शेतीमालाला हमीभाव नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. कोणते पीक घ्यावे त्याला हमी भाव मिळेल हे सांगता येत नसल्याने हमीभाव असलेला गांजा पिकवण्याची परवानगी सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्याने मागितली आहे. माझ्या मालकीच्या शेतात दोन एकर गांजा लावण्यास परवानगी मिळावी अशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना या शेतकऱ्याने दिल्याने याची एकच चर्चा सोलापूर जिल्ह्यातील गावागावात सुरू आहे. अनिल आबाजी पाटील यांची सोलापूर जिल्ह्यातील शिरापूर येथे स्वत:च्या मालकीची जमीन गट नं १८१/४ असून, या क्षेत्रात दोन एकर गांजा लावण्यासाठी प्रशासनाने परवानगी द्यावी असे निवेदन जिल्हा आणि पोलीस प्रशासनाला त्यांनी लेखी दिले आहे.