पंढरपूर(सोलापूर)- तालुक्यातील एका शेतकऱ्याने पंढरपूर प्रांत कार्यालयाजवळील उंच टॉवरवर चढून आमरण उपोषण सुरू केले आहे. वाटपाच्या नोंदी मिळाव्यात व आदेशाची नक्कल मिळावी, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. कुबेर चिमाजी घाडगे (मु. पो. देगाव ता. पंढरपूर जि. सोलापूर) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. या आंदोलनामुळे प्रशासनाची एकच धावपळ उडाली.
पंढरपुरात टॉवरवर चढून शेतकऱ्याचे आंदोलन प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्यामुळे आंदोलन
जिल्हाधिकारी व न्यायालयाने हुकूमनाम्यामध्ये एक वादी व सहा प्रतिवादी असताना कुणाचा वाटप तक्ता तयार करण्याबाबत व नोंद देण्याबाबत आदेश केला होता. मात्र तरीही शेतकऱयाला नोंदी व नक्कल मिळालीच नाही. या शेतकऱ्याने याआधीही सोलापूर येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील टॉवरवर अशाप्रकारचे आंदोलन केले होते. त्यावेळी अधिकाऱ्यांनी समजूतदारपणा दाखवत आंदोलन मागे घेण्यास सांगितले होते.
आंदोलन मागे घेण्यासाठी अधिकाऱ्यांकडून विनवण्या
सोमवारी सकाळीच शेतकरी टॉवरवर चढल्याने प्रशासनाची मात्र धावपळ उडाली आहे. प्रांत कार्यालयासमोर अधिकारी उपस्थित झाले होते व त्यांनी चिमाजी घाडगे यांच्याशी उपोषण स्थगित करण्यासंदर्भात फोनद्वारे विनवणी केली आहे. मात्र, शेतकऱ्याकडून त्याला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. मात्र, यानंतर प्रशासनाने समजूत काढल्यानंतर घाडगे यांनी आंदोलन मागे घेतल्याचे समजते.