माढा (सोलापूर) -माढ्याच्या माजी जि. प. सदस्या मंदाकिनी साठे यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांनी पारंपरिक रुढी पंरपरेला छेद दिला आहे. मंदाकिनी साठे यांच्या अस्थिचे विसर्जन शेतात न करता वृक्षारोपण करून समाजासमोर साठे परिवाराने पर्यावरण रक्षणाचा वैज्ञानिक दृष्टिकोनाचा संदेश दिला आहे.
मंदाकिनी साठे यांचे अल्पशा आजाराने १६ मार्च रोजी सकाळी साडेआठ वाजता निधन झाले होते. त्यांचे पती माजी आमदार धनाजी साठे यांच्यासह कुटुंबातील सदस्यांनी पारंपरिक प्रथेप्रमाणे विधी आणि अस्थिचे विसर्जन नदीत केले नाही. स्वतःच्या शेतात अस्थि टाकून त्यावर त्यांनी वृक्षाची लागवड केली आहे.
वृक्षारोपणाने अस्थीचे विसर्जन मंदाकिनी साठे यांचे नात-नातू कनिष्का साठे, वेदांत साठे, हर्षवर्धन साठे व अजित चव्हाण यांच्या हस्ते महातपूर रस्त्यालगत असलेल्या साठे मळ्यात आंबा व वड यासह अन्य वृक्षाचे रोपण करण्यात आले. वृक्ष संवर्धनाची शपथदेखील यावेळी नातवांनी घेतली. यावेळी माजी आमदार धनाजी साठे, काँग्रेसचे नेते दादासाहेब साठे, नगराध्यक्षा अॅड मीनल साठे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. याच बरोबर मराठा समाजात असलेल्या रुढी परंपरेप्रमाणे असलेला विधीचा कालावधी कमी करीत पाचव्याच दिवशी दहाव्याचा कार्यक्रम घेण्याचा निर्णयदेखील घेतला आहे.
हेही वाचा-उद्धव ठाकरेंना पैसे वसुलीसाठी माणूस हवा होता; किरीट सोमैय्यांचा खळबळजनक आरोप
सोलापूर जिल्ह्याचे सहकार महर्षी गणपतराव साठे यांच्या विचारांचा वारसा घेऊन माढ्याचे साठे कुटूंब समाजकारणाबरोबरच राजकारणात सक्रिय आहे. अशातच पर्यावरण आणि जलप्रदूषण रोखण्यासाठी साठे परिवाराने उचलले पाऊल समाजासाठी दिशादर्शक आहे. साठे कुटुंबियांच्या पुरोगामित्वाचे विविध स्तरातुन कौतुक होत आहे.
माजी आमदार धनाजीराव साठे म्हणाले की, अनेक रुढी व पंरपरामध्ये आजही समाज अडकून पडला आहे. शेतात माझ्या पत्नीने कष्ट केले होते. त्याच शेतात अस्थि टाकून वृक्षारोपण केले. समाजाने बदल घडवणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगिते.
हेही वाचा-हापूस आंब्याच्या आगमनाची उत्सुकता संपली, पुण्याच्या मार्केटयार्डात आंबा दाखल