सोलापूर -सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील सर्व रुग्णालयात ऑक्सिजनचा पुरेसा साठा आहे. त्याचबरोबर अधिकची मागणी लक्षात घेवून जिल्ह्यात ऑक्सिजनचे उत्पादन सुरु करण्यात आले आहे, अशी माहिती पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शुक्रवारी (दि.4 सप्टें) आढावा बैठकीनंतर माध्यमांना दिली.
पालकमंत्री भरणे यांनी शुक्रवारी दिवसभर विविध विषयांवर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठका घेतल्या तसेच कोरोनाला रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेतला. या बैठकीस जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, महापालिका आयुक्त पी.शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.भीमाशंकर जमादार, डॉ.शीतलकुमार जाधव आदी उपस्थित होते.
पालकमंत्री भरणे म्हणाले, सोलापूर शहर आणि जिल्ह्यात शेजारील जिल्ह्यातून उपचारासाठी रुग्ण येत आहेत. त्यामुळे ऑक्सिजनची मागणी वाढली आहे. मात्र, जिल्ह्यात फक्त दोनच प्रकल्पातून ऑक्सिजन उत्पादन होते. त्यांची क्षमता वाढविण्यात येत आहे. त्याचबरोबर टेंभुर्णी औद्योगिक वसाहतीतील बंद असलेला एक प्रकल्प सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात पुरेसा ऑक्सिजनसाठा उपलब्ध होईल. याशिवाय पुणे आणि कर्नाटकातूनही ऑक्सिजन आणता येईल का याबाबत प्रयत्न सुरु आहेत.