सोलापूर -पंढरपूर शहरामध्ये एका अकरा वर्षीय मुलाचे अपहरण झाल्याची घटना घडली आहे. मुलाच्या आईने पंढरपूर शहर पोलीस ठाणेमध्ये अपहरणाचा गुन्हा दाखल केला. याप्रकरणी अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रवी विष्णू चव्हाण (वय.११ रा. ज्ञानेश्वर नगर पंढरपूर) असे अपहरण झालेल्या मुलाचे नाव आहे.
पंढरपुरात अकरा वर्षाच्या मुलाचे अपहरण हेही वाचा -आयसीसी विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या टेबलमध्ये टीम इंडियाची भरारी
२५ डिसेंबर रोजी रवी हा मुलांसोबत खेळण्यासाठी घराबाहेर गेला होता. रात्री साडेनऊ वाजले तरी रवी घरी परतला नाही. रवीबाबत त्याच्या आईने गल्लीतील मुलांकडे चौकशी केली असता. तो एकटाच शेवटपर्यंत खेळत असल्याचे सांगण्यात आले. आईसह गल्लीतील नागरिकांनी आसपासच्या परिसरात शोधाशोध केली असता. रवी कुठेही आढळून आला नाही. त्यानंतर रवीच्या आईने पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली.
रवी चव्हाण याच्या अपहरण प्रकरणी त्याची आई राणी विष्णू सावंत यांनी पंढरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. रवीचे वडील कामानिमित्ताने तमिळनाडू राज्यात असतात. रवीची आई मोलमजुरी करून मुलाचा सांभाळ करते.