बार्शी (सोलापूर) - कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजनाही केली जात आहे. मात्र, बार्शी शहरात एकाच गल्लीत तब्बल 11 रुग्ण आढळले आहेत. ज्या भागात 5 पेक्षा अधिक रुग्ण आढळून येतील तो भाग सील करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आले आहेत. त्यानुसार पाटील प्लॉटचा भाग 14 दिवसासाठी सील करण्यात आला आहे.
बार्शी शहरासह ग्रामीण भागात कोरोनाग्रस्त आढळून येत आहेत. मात्र, एकाच वेळी एकाच गल्लीत 11 रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून पाटील प्लॉट येथे तपासणी सुरू असताना या भागात तब्बल 11 रुग्ण आढळून आले होते. या भागात 25 हून अधिक घरे असून 100 पेक्षा अधिक नागरिक वास्तव्यास आहेत. मात्र, एकाच वेळी हे रुग्ण आढळून आल्याने प्रत्येकाची तपासणी केली जात आहे. शिवाय प्रवेश प्रतिबंध करण्यात आली आहे. नागरिकांना मूलभूत सोई-सुविधा या नगरपालिकेच्या वतीने पोहोचविण्यात येणार आहेत. संबंधित घटनेची माहिती मिळताच नगरपालिकेचे अधिकारी महादेव बोकेफोडे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी हा परिसर सील केला आहे. शिवाय वयोवृद्ध रुग्णांना पुढील उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.