सोलापूर - देशाला सक्षम नेतृत्व, शेतकऱ्यांना सन्मान, उद्योजक वाढवून देशाची आर्थिक व्यवस्था सक्षम करण्यासाठी आणि नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी भाजप आणि शिवसेनेच्या उमेदवारांना निवडून द्या, असे आवाहन केंद्रीय उद्योग आणि नागरी वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांनी केले आहे.
भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार डॉ. जयसिध्देश्वर महास्वामी यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी शिवस्मारक सभागृहात उद्योजक, व्यापारी आणि प्रतिभावंताचा मेळावा घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सहकारमंत्री सुभाष देशमुख, प्रदेश भाजप पदाधिकारी रघुनाथ कुलकर्णी, महापौर शोभा बनशेट्टी, जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, शहर अध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी, किशोर देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी ते म्हणाले, की देशाच्या इतिहासामध्ये अनेक अमूलाग्र बदल करून देश विकासाच्या वाटेवर वेगाने नेणारे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांची संपूर्ण जगभरात चर्चा आहे. देशातील रस्ते, रेल्वे, विमान आणि जलवाहतुकीचे पर्याय सर्वसामान्यापासून ते अनेक उद्योगाला सहज उपलब्ध करून देण्यात आले. रेल्वेच्या बजेटमध्ये सांगितलेल्या १०० टक्के योजना पूर्ण करण्यात आले. देशात प्रत्येक महिन्याला १ विमानतळ सुरू करण्याचा विक्रम मोदी सरकारने केला. उद्योग वाढला, कृषी क्षेत्रातही अनेक अमूलाग्र बदल झाले. देशाची आर्थिक व्यवस्था सुदृढ करण्यासाठी अनेक चांगले निर्णय घेण्यात आले. अनेक चुकीच्या लोकांवर कडक कारवाईसाठी पावले उचलले जात आहेत. आपल्या देशाला नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व मिळाले हे आपले भाग्य आहे.
लघु उद्योजकांना त्यांच्या वार्षिक व्यवहाराची मर्यादा वाढवण्यासाठी कर धोरणात बदल करण्यात आले. नवीन उद्योजकांना सहज सर्व सोईसुविधा उपलब्ध करण्यात आल्या. मागील सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आणि सक्षम नसलेल्या नेतृत्वामुळे देशाची प्रगती झाली नाही. परंतु गेल्या ५ वर्षात मोदी सरकारने देशाला सक्षम नेतृत्व तर दिलेच तसेच विकासाचा वेगही वाढवला. जगभरात आपल्या देशाची मान उंचावण्याचे कामही मोदी सरकारने केले आहे. सर्व सामान्यांच्या अपेक्षा पूर्ण करणारे सरकार म्हणून मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान पदावर बसवणे गरजेचे असल्याचे सुरेश प्रभू यांनी म्हटले.
मोदी पुन्हा पंतप्रधान होणार आहेतच आणि देशाच्या विकासाची गती दुप्पट तिप्पट वेगाने वाढणार आहे. मागील ७० वर्षात जे झाले नाही ते मोदी सरकारने गेल्या ५ वर्षात केले. पायाभूत सोई सुविधा वाढवल्याने शेतकरी, उद्योजक आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठा फायदा झाला आहे. रेल्वेतील प्रवाशाला योग्य सेवा मिळत नसेल तर त्याला थेट रेल्वे मंत्र्याकडे तक्रार करण्याची सुविधा उपलब्ध करून त्या प्रवाशाला प्रवासातील अडचणी सोडवून चांगले प्रशासन देण्याचा प्रयत्नही मोदी सरकारने केला असल्याचे सुरेश प्रभू यांनी सांगितले.
सर्वसामान्यांच्या चेहऱ्यावरील आनंद दिसावा म्हणून मोदींना पुन्हा पंतप्रधान केले पाहिजे, असे सांगून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या महायुतीचे सोलापूर लोकसभा मतदार संघातील उमेदवार डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामी यांना निवडून द्या, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. प्रारंभी भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या मेळाव्याचे सूत्रसंचालन ज्येष्ठ नेत्या प्रा. मोहिनी पत्की यांनी केले तर आभार शहर अध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी यांनी व्यक्त केले.