सोलापूर -करमाळा तालुक्यात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले आहे. पावसामुळे हातातोंडाशी आलेल्या पिकांची प्रचंड नासाडी झाली आहे. खरिपाचे पीक या सततच्या पावसाने भिजून गेले आहे. तर कापणी करण्यात आलेले पिकाला कोंब फुटले आहेत. वरिष्ठ स्तरावरून शासनाने नुकसानग्रस्त भागाचे सर्वेक्षणाचे आदेश दिले आहेत. शासनाने खरीप हंगामातील पिकांचे तत्काळ पंचनामे करून सरसकट पीकविमा मंजूर करावा. तसेच रब्बी हंगामातील पिकांना तत्काळ नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
हेही वाचा - खरिपाच्या पिकांची दुरवस्था; शेतकऱ्याने गाण्यातून मांडली व्यथा..
विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत मात्र पीक नुकसानीचे पंचनामे रखडले आहेत. त्यामुळे मतदारसंघातील पीक नुकसानीचे पंचनामे केव्हा होणार? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तालुका मंडळमधील पिकांचे सर्वेक्षण करून पंचनामे करण्याचे आदेश देण्याची गरज आहे. पावसाळा संपला तरी परतीचा पाऊस बरसत आहे. मागील काही दिवसांपासून तालुक्यात पावसाची दमदार हजेरी आहे. पावसामुळे ज्वारी, मका, कांदा या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास परतीच्या पावसाने पळविला आहे. पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. तरी तालुक्यात अद्यापही नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू नाही.
बहुतांश शेतकरी बांधवांनी पीकविमा योजनेअंतर्गत विमा काढला आहे. तर अनेक शेतकऱ्यांनी मागील वर्षी पीक विमा भेटला नसल्याने यंदा पीक विमा काढला नाही. नुकसानीचे प्रमाण अधिक असल्याने ग्रामीण भागातील शेतकरी हे शासनाच्या मदतीकडे आस लावून आहेत. तर काही शेतकऱ्यांनी पीक विमा भरला नाही त्यामुळे त्या शेतकऱ्यांना अडचणी अडचण येत आहेत. तसेच शासनाकडून अद्यापही करमाळा तालुक्यात नुकसानीचे पंचनामे केले नाहीत. त्यातच शासनाकडून ४८ तासात शेतकऱ्यांनी नुकसानीची माहिती कळवावी अशी जाचक अट घातली आहे. काही शेतकऱ्यांच्या शिवारातून पाणी वाहत आहे. पर्यायाने शासनाला शेतकऱ्यांनी मदत द्यायची आहे की नाही असा संशय प्रश्न अनेक शेतकऱ्यांनी पडत आहे?