सोलापूर -भीमा नदीला आलेल्या पुराच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहरातील जवळपास २ हजार कुटुंबांना प्रशासनाने सुरक्षित स्थळी हलवले आहे. या सर्वांना वारी काळासाठी तयार करण्यात आलेल्या ६५ एकर परिसरात निवारा देण्यात आला असून त्या ठिकाणी पाणी आणि नागरी सुविधा पुरविण्यात आल्या आहेत.
पूराचे थैमान, पंढरपूर शहरातील २ हजार कुटुंबांना हलवले सुरक्षित स्थळी
भीमा नदीला पूर आल्यामुळे पंढरपूर शहरातील जवळपास २ हजार कुटुंबांना प्रशासनाने सुरक्षित स्थळी हलवले आहे.
उजनी आणि वीर धरणातून मोठ्या प्रमाणात येणाऱ्या पाण्यामुळे पंढरपूर शहराच्या बाजूने असलेल्या झोपडपट्ट्यांमधली नागरी वस्ती आता उठली आहे. व्यास नारायण झोपडपट्टी, अंबाबाई पटांगण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, गोपाळपूर रोड, कुष्ठरोग वसाहत, भजनदास चौक, तांबडा मारुती चौक आणि महात्मा फुले पुतळा या परिसरात हे पुराचे पाणी घुसल्यामुळे येथील लोकांना आपल्या घरातील फक्त दैनंदिन संसारोपयोगी साहित्य घेऊन ६५ एकर परिसरामध्ये आश्रय घ्यावा लागला आहे. तोडक्या-मोडक्या झोपडपट्टीत राहणारी ही लोकं घर पाण्यात गेल्यानंतर आता स्थलांतरित झाली आहेत. त्यांना सरकारी मदतीची अपेक्षा असून ते नदीचे पाणी कधी कमी होते याची वाट पाहत आहेत.