सोलापूर- मद्यधुंद ट्रक चालकाने चेकपोस्ट उडविल्याची घटना घडली आहे. यामुळे कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गेल्या बारा दिवसांत चेकपोस्ट मध्ये ट्रक घुसल्याची ही दुसरी घटना आहे. यामध्ये एक पोलीस कर्मचारी व एक शिक्षक गंभीर जखमी झाले आहेत. रविवारी मध्यरात्री सव्वा दोनच्या सुमारास हा अपघात झाला आहे. या अपघातात पोलीस कर्मचारी सचिन ठोसर व शिक्षक मुकुंद शेटे जखमी झाले आहेत.
मद्यधुंद ट्रक चालकाने चेकपोस्ट उडविले; हैदराबाद नाक्यावर मध्यरात्रीची घटना - सोलापूर चेकपोस्ट
ट्रक भरधाव वेगाने लोखंडी सुरक्षा गार्ड उडवित बंदोबस्तावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या अंगावर आला. या अपघातात पोलीस कर्मचारी सचिन ठोसर व शिक्षक मुकुंद शेटे जखमी झाले आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहराबाहेर एकुण आठ चेकपोस्ट उभारले आहेत. प्रत्येक नाक्यावर 10 पोलीस कर्मचारी, 8 होमगार्ड, 4 मनपा कर्मचारी व 4 शिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. रविवारी मध्यरात्री ट्रक क्रमांक एच आर 55 वाय 2038 हा ट्रक भरधाव वेगाने लोखंडी सुरक्षा गार्ड उडवित बंदोबस्तावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या अंगावर आला. ट्रक चालकाने मद्यप्राषण केले होते, अशी माहिती जखमींनी दिली. ट्रकने उडविलेले लोखंडी सुरक्षा गार्ड( बैरिकेट) प्रचंड वेगाने मंडपावर येऊन आदळून मंडपाचे लाकडी खांब तोडुन बंदोबस्तात असलेल्या कर्मचारीच्या अंगावर येऊन पडले. यामध्ये पोलीस कर्मचारी सचिन ठोसर व शिक्षक मुकुंद शेटे यांना इजा झाल्या. लोखंडी गार्ड ट्रकच्या टायरमध्ये घुसल्याने पुढील टायर फुटुन ट्रक रोड गार्डला धडकुन खांबला. पळून जाण्यासाठी चालकाने गाडीबाहेर ऊडी मारली. मात्र, तो पडल्याने पोलीस कर्मचारी इंगळे यांनी त्यास पकडले. या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस घटनास्थळी आले आणि जखमींना रुग्णालयात हलविले.
दरम्यान, 12 दिवसापूर्वी याच न्यू हैद्राबाद नाक्यावर एक भरधाव ट्रक घुसून काही कर्मचारी जखमी झाले होते. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नव्हती. पुन्हा त्याच घटनेची पुनरावृत्ती झाली.