महाराष्ट्र मंदिर महासंघाची वस्त्र संहितेबाबत भूमिका सोलापूर :'महाराष्ट्र मंदिर महासंघा'चे सदस्य राजन बुणगे यांनी सांगितले की, तोकडे कपडे घालून आलेल्या महिलांना, तरुणींना मंदिर प्रशासन हे सलवार कमीज देणार आहे. तसेच पुरुषांना देखील वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आहे. फॅशन म्हणून काही तरुण, पुरुष फाटक्या जीन्स, फाटके टी शर्ट घालून मंदिरात येतात. पुरुषांनी देखील फाटके जीन्स, फाटके टी शर्ट घालून येऊ नये असे मंदिराच्या विश्वस्तांनी जाहीर केले आहे.
या शहरातील मंदिरात वस्त्रसंहिता :सोलापुरातील मंदिर समितीच्या विश्वस्तांनी रविवारी 11 जून रोजी सोलापूर येथील प्रसिद्ध श्री हिंगुलांबिका मंदिरात पत्रकार परिषद घेतली. महासंघाचे सदस्य बुणगे म्हणाले की, सोलापूरप्रमाणेच यापूर्वी मुंबई, ठाणे, रायगड, जळगाव, अकोला, धुळे, नागपूर, नाशिक, अमरावती, अहिल्यानगर (नगर) यांसह कोकण विभागातील मिळून महाराष्ट्रातील एकूण 131 मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आहे. मंदिरात वस्त्रसंहिता नियमांचे पालन केले जात आहे. तर सोलापुरात देखील 17 मंदिरात वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
17 मंदिरात वस्त्रसंहिता :सोलापूर येथील श्री हिंगुलांबिका मंदिर, स्टेशन रोड येथील शनी मंदिर, पंचमुखी हनुमान मंदिर, तळेहिप्परगा येथील मश्रुम गणपती मंदिर, पूर्वभाग येथील श्रीराम मंदिर, महालक्ष्मी मंदिर (अक्कलकोट रोड), श्री वैष्णव मारुती मंदिर, श्री गणेश मंदिर (साईबाबा चौक), गीता मंदिर देवस्थान, जुने दत्त मंदिर(दत्त चौक), श्री साईबाबा मंदिर (भद्रावती पेठ), श्री काळा मारुती मंदिर(साखर पेठ), श्री मारुती मंदिर(जोडबसवणा चौक), श्री नागनाथ मंदिर(शशिकला नगर,मजरेवाडी ), श्री राम मंदिर(दाजी पेठ) या मंदिरात वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आहे.
मंदिर विश्वस्तांचे आवाहन :मंदिरांच्या विश्वस्तांनी मंदिराचे पावित्र्य, रक्षण आणि भारतीय संस्कृतीचे पालन करावे हा यामागील उद्देश आहे. मंदिरामध्ये भाविकांनी येताना अंगप्रदर्शन करणारे उत्तेजक तथा तोकडे कपडे घालून येऊ नये. तसेच भारतीय संस्कृतीचे पालन करून मंदिर प्रशासनास सहकार्य करावे, अशा प्रकारचे आवाहन केले आहे. तसा फलकही मंदिराच्या दर्शनी भागात लावण्यात आला आहे.
या मंदिराला पाठविले पत्र :सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी समर्थ मंदिर, श्री समाधी मंदिर अक्कलकोट, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोट यांना पत्र दिले आहे. लवकरच अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात वस्त्र संहिता लागू करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे सांगितले. तसेच बार्शी येथील भगवंत मंदिर, पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर, शहरातील श्री सिद्धेश्वर मंदिर, श्री खंडोबा देवस्थान (सोलापूर शहर),अकलूज येथील अकलाई मंदिर देवस्थान या मंदिराच्या विश्वस्तांना महाराष्ट्र मंदिर महासंघाने पत्र पाठवून वस्त्र संहिता लागू करण्यासाठी विनंती केली आहे.