महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कार्तिकी वारी यंदा नकोच; जिल्हाधिकारी व जिल्हा अधीक्षकांचा मुख्यमंत्र्यांना प्रस्ताव

पाडवा मुहूर्तावर श्री विठ्ठल मंदिर खुले करण्यात आले आहे. तसेच पांडूरंगाची कार्तिकी वारी 26 नोव्हेंबरपासून होणार आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कार्तिकी यात्राही आषाढी यात्रेप्रमाणे प्रतिकात्मक स्वरुपात साजरी व्हावी, असा प्रस्ताव जिल्हाधिकारी व जिल्हा अधीक्षकांनी मुख्यमंत्र्यांना पाठवला आहे.

श्री विठ्ठल मंदिर
श्री विठ्ठल मंदिर

By

Published : Nov 19, 2020, 1:28 PM IST

पंढरपूर -कार्तिकी यात्रा मोजक्याच दिवसांवर आली आहे. तसेच पाडवा मुहूर्तावर श्री विठ्ठल मंदिर देखील खुले करण्यात आले. कार्तिकी वारी 26 नोव्हेंबरला होणार असून यावेळी पंढरीत वारकऱ्यांची मोठी गर्दी होण्याची शक्‍यता आहे. त्यात सोशल डिस्टन्सिंगसह अन्य नियमांचे पालन होणार नाही. वारकऱ्यांच्या संख्येत आरोग्य यंत्रणा अपुरी पडेल. त्यामुळे यंदाची कार्तिकी यात्राही आषाढी यात्रेप्रमाणे प्रतिकात्मक स्वरुपात साजरी व्हावी, असा प्रस्ताव जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठवला आहे.

कार्तिकी वारी 'या' कारणांमुळे रद्द करण्याची मागणी -

विठ्ठल मंदिरे सुरू झाल्यानंतर पंढरीत येणाऱ्या भाविकांची संख्या वाढली आहे. आता दररोज दोन हजार भाविकांना मुखदर्शनासाठी सोडले जात आहे. मात्र, आठ महिन्यांपासून श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर बंद असल्याने यंदा कार्तिकी वारीसाठी वारकऱ्यांची मोठी गर्दी होईल. दर्शन रांगेत तथा वाळवंटात, मठात वारकऱ्यांची गर्दी होऊन सोशल डिस्टन्सिंगचे पालन होऊ शकणार नाही. त्या गर्दीत वयस्कर भाविकांना श्‍वास घेण्यास अडचणी येतील. दोन व्यक्‍तींमध्ये सहा फुटांचे अंतर ठेवल्यास सध्याची पाच किलोमीटरची रांग 25 किलोमीटरपर्यंत जाईल. गर्दीमुळे आरोग्य यंत्रणाही अपुरी पडेल. त्यामुळे वाळवंट परिसरात 65 एकर परिसरात वारकऱ्यांना राहता येणार नाही. म्हणून वारी रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.

मुख्यमंत्र्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून पाठविला प्रस्ताव -

कार्तिकी वारीनिमित्ताने पंढरपुरात भाविकांची गर्दी होण्याची शक्‍यता आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सुरक्षितता म्हणून भाविकांना यंदाची वारी प्रतिकात्मक स्वरुपात साजरी व्हावी, असा प्रस्ताव जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून सरकार दरबारी पाठविला आहे. त्यानुसार तो प्रस्ताव आता विधी व न्याय विभागाच्या माध्यमातून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे गेला आहे.

उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीवर आचारसंहितेचे सावट व मराठा समन्वय समितीकडून विरोध -

कार्तिकी यात्रेच्या शासकीय महापूजेसाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निमंत्रण देण्यात आले आहे. त्यांच्या आगमनाच्या दृष्टीने प्रशासनाने व मंदिर समितीतर्फे सर्व उपाययोजना केल्या आहेत. मात्र, पदवीधर व शिक्षक आमदारकीच्या निवडणुकीची आचारसंहिता सध्या सुरू आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाकडून त्यासाठी मान्यता घ्यावी, असाही प्रस्ताव विधी व न्याय विभागाला जिल्हा प्रशासनाकडून पाठवण्यात आला आहे.

निवडणूक आयोगाकडून मान्यता मिळाल्यानंतरच उपमुख्यमंत्र्यांच्याहस्ते शासकीय महापूजा होणार आहे. तर मराठा समाज आरक्षणाबाबत पंढरपुरात आक्रमक होताना दिसत आहे. कार्तिकी वारीला येण्याआधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा. अशा मागण्यांचे निवेदन तहसील कार्यालय देण्यात आले आहे. तसे न केल्यास कार्तिकी वारीसाठी उपमुख्यमंत्र्यांना पंढरपुरात येऊ न देण्याचा इशारा मराठा समन्वयक संघटनेच्यावतीने देण्यात आला आहे.

हेही वाचा-जम्मू काश्मीर : नागोर्ता टोल प्लाझाजवळ चकमक; चार दहशतवाद्यांचा खात्मा

हेही वाचा-बेकायदेशीर अन लंगोटी परिपत्रकामुळे मागास समाजाचे आरक्षण कमी- आंबेडकर

ABOUT THE AUTHOR

...view details