सोलापूर- पावसाने झालेल्या नुकसानीची भरपाई लवकरच दिली जाईल, असे आश्वासन विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज (शनिवार) शेतकऱ्यांना दिली. डॉ. म्हैसेकर यांनी आज सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर, बार्शी आणि मोहोळ तालुक्यातील वडाळा, शेळगाव आणि सावळेश्वर येथील नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली. त्यांनी शेतकऱ्यांकडून नुकसानीची माहिती घेतली.
माहिती देताना विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर
यावेळी ,जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार, प्रांत अधिकारी हेमंत निकम, उपसंचालक रवींद्र माने, जिल्हा परिषदेचे सदस्य बळीराम साठे आदी उपस्थित होते.
हेही वाचा - उजनी जलाशयातून ढोकरी ते शहा प्रवासी बोट सुरू
डॉ. म्हैसेकर यांनी पिकांची पाहणी केल्यावर नुकसानीचे पंचनामे तत्काळ करावे, यासाठी जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांची मदत घ्यावी, नुकसान झालेल्या पिकांची छायाचित्रे काढून ठेवावी, अशा सूचना केल्या आहेत.
पीक विमा उतरलेल्या शेतकऱ्यांना भरपाई मिळण्याबाबतची कागदपत्रे तयार करावीत. त्यासाठी तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक यांनी एकत्र येऊन काम करावे, असे सांगितले. येत्या आठ दिवसांत नुकसानीचे पंचनामे केले जातील, त्यांच्या आधारे मदतीसाठी अहवाल तयार केला जाईल, असे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी सांगितले.
हेही वाचा - उजनी धरण क्षेत्रात 474 मिलिमीटर पावसाची नोंद
म्हैसेकर यांनी वडाळा येथे जयसिंग साठे, कृष्णात साठे, मनोज साठे, धर्मराज साठे, विजय साठे यांच्याकडून नुकसानीची माहिती घेतली. सावळेश्वर येथे दत्तात्रय मसलकर, शिवाजी काकडे, शहाजी काकडे, विलास काकडे, धोंडिबा नीळ यांच्याकडून माहिती घेतली.