पंढरपूर ( सोलापूर ) -पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा तसेच नमामी चंद्रभागा अभियानातंर्गत सुरू असलेल्या व करण्यात येणाऱ्या कामांचा आढावा जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर ( Collector Milind Shambharkar ) यांनी घेतला. यावेळी संबधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. तीर्थक्षेत्र विकास आराखडा व नमामी चंद्रभागा अभियानातंर्गत कामांचा आढाव्याबाबत शासकीय विश्रामगृह पंढरपूर येथे बैठक घेण्यात आली. बैठकीस प्रांताधिकारी गजानन गुरव, आप्पासाहेब समिंदर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशाधिन शेळकंदे उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम, जिल्हा नियोजन अधिकारी सर्जेराव दराडे, कार्यकारी अभियंता दत्तात्रय गावडे, गटविकास अधिकारी प्रशांत काळे, मुख्याधिकारी अरविंद माळी, आगार व्यवस्थापक सुधीर सुतार यांच्यासह संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
पालखी बरोबर येणाऱ्या वारकरी, भाविकांना आवश्यक सोयी सुविधा देण्यासाठी भंडीशेगांव, पिराची कुरोली, वाखरी येथील पालखी तळांच्या विस्तारीकरणासाठी भुसंपादन करण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्यात यावी. तसेच आराखड्यातील चंद्रभागा नदीवरील मंजूर घाट बांधणे, पुंडलीक मंदीर, विष्णूपद मंदीर परिसर सुधारण्याबाबत तात्काळ कार्यवाही करण्यात यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी शंभरकर यांनी यावेळी दिल्या.