सोलापूर - सोलापूर ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आज ग्रामीण भागात १८८९ जणांना कोरोना विषाणूची लागण झाली. तर ४५ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान काही शहरात मात्र कोरोनाची ही दुसरी लाट कमी होत असल्याचे चित्र आहे. शनिवारी शहरात १२५ नवे रुग्ण आढळले आहेत. तर ९ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शहर आणि ग्रामीण असे एकूण २०१४ जणांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. तर एकूण ५४ जणांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर शहरात १२५ जणांना लागण, ९ मृत्यू आणि १५४ जण कोरोना मुक्त
एकीकडे सोलापूर जिल्ह्यात ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. तर, शहरात कोरोना विषाणूचा वाढता प्रभाव आता हळूहळू कमी होत आहे. शनिवारी सोलापूर शहरात १८७२ जणांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये १२५ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये ७६ पुरुष तर ४९ स्त्रिया आहेत. दरम्यान सोलापूर शहरात विविध रुग्णालयांत उपचार घेत असलेल्या ९ पॉझिटिव्ह रुग्णांचा उपचारादरम्यान आज मृत्यू झाला. मृतांमध्ये ७ पुरुष आणि २ स्त्रियांचा समावेश आहे. शनिवारी सोलापूर शहरात १५४ रुग्णांनी कोरोना आजारावर मात केली आहे. सध्या सोलापूर शहरात १७३५ रुग्ण पॉझिटिव्ह आहेत. त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.