पंढरपूर -कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेमुळे राज्य सरकारकडून शाळा बंद ठेवण्यात आल्यात. मात्र, कोरोनामुळे शाळा बंद असल्या तरी शिक्षण मात्र ऑनलाइन सुरू आहे. त्यात जिल्हा परिषदेतल्या वस्तीवरच्या शाळेमध्ये ऑनलाइन प्रणालीचे शिक्षण जिकिरीची गोष्ट असते. त्यातही शाळेतील काही शिक्षक असे असतात की त्यांच्या अस्तित्वाने शाळेतील वातावरणच बदलून जाते. अशाच एक शिक्षीका माळशिरस तालुक्यातील शिंदे वस्ती शाळेमध्ये आहेत. त्या येथील चिमुकल्यांना आपल्या खास शैलीत मातृभाषेची उजळणी देतात. सुप्रिया शिरगुंडे असे शिक्षीकेचे नाव आहे. गेल्या दीड वर्षात चिमुकल्यांच्या शिक्षणामध्ये त्यांनी जराही खंड न पडू देता अत्याधुनिक शिक्षणाच्या पद्धतीची जोड या विद्यार्थ्यांना शिकवण्याचे काम केले आहे.
शिंदे वस्तीतील ओट्यावरील शाळा -
कोरोनामुळे आपल्या सभोवताली अनेक बदल झाले. त्याला शिक्षणक्षेत्रही अपवाद नव्हते. कोरोमुळे डिजीटल शाळा ही संकल्पना पुढे आली. त्यानुसार शिंदे वस्तीतील शाळेतही पीडीएफच्या माध्यमातून अभ्यासक्रम शिकवण्याची सुरुवात झाली. मात्र, विद्यार्थ्यांना यात अनेक अडचणी येत होत्या. त्यामुळे सुप्रिया शिवगुंडे यांनी शिंदे वस्तीतील एका झाडाखाली बसून विद्यार्थ्यांना शिकवण्यास सुरुवात केली. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण झाली. यावेळी दररोज एकाच विषयाचा अभ्यास युट्युब द्वारे शिकवण्यात येत होता. शिक्षणासोबतच अनुरूप चित्रे, पेपर क्राफ्टींग, आनंदाचे झाड, सेल्फी विथ माझे मित्र, संडे-फन डे, झाडे माझे मित्र, कनेक्टिंग क्लासरूम टुगेदर असे विविध उपक्रमही राबवण्यात आले. या उपक्रमांद्वारे या लहान विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम शिक्षिका सुप्रिया शिवगुंडे व त्यांचे सहकारी शिक्षक गणेश शिंदे यांनी केले.