सोलापूर : सोलापूर शहरातील श्री सिद्धेश्वर सहकारी सहकारी साखर कारखान्याची चिमणी पाडून एक दिवस उलटला. चिमणी पडू नये यासाठी माजी संचालक धर्मराज काडादी यांनी शर्थीचे प्रयत्न केले होते. साखर कारखान्याच्या चिमणीला गेल्या पाच वर्षांपासून राजकीय स्वरूप आले होते. राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी व शरद पवारांनी भरपूर मदत केली होती अशी माहिती, धर्मराज काडादी यांनी पत्रकार परिषदेत दिली. एवढे प्रयत्न फक्त शेतकऱ्यांच्या हितासाठी केले पण अपयश आले. अखेर राजकारण करत चिमणी विरोधकांना यश आले. चिमणी पाडण्यासाठी मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता, त्यावर धर्मराज काडादी यांनी वादग्रस्त विधान केले. पाकिस्तानवर ज्याप्रमाणे हल्ला केला जातो त्याप्रमाणे चिमणी पाडण्यात आली असे काडादी यांनी सांगितले.
पुढील दोन हंगाम गाळप होणार नाही: श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्यात 2014 पासून को जनरेशनचा प्लांट उभा करण्यात आला होता. जवळपास अडीच ते तीन कोटी रुपये खर्च झाला होता. या को जनरेशनच्या प्लांटमधून वीज उत्पादन केले जात होते. ही चिमणी पाडल्याने साखर कारखान्याचे मोठे नुकसान झाले आहे. पुढील दोन हंगाम गाळप होणार नाही अशी माहिती, धर्मराज काडादी यांनी दिली. आगामी काळात या सर्व परिस्थितीवर मात करत कारखाना चालू करून दाखवण्याची वेळ आली आहे. काडादी म्हणाले, सिध्देश्वरची चिमणी विमानतळाच्या धावपट्टीला अडथळा ठरत नव्हती. 'डिजीसीए'चा सर्व्हे चुकला होता. त्यामुळेच हायकोर्टाने पुन्हा सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते. नव्या अहवालाची वाट न पाहता कारवाई करण्यात आली. चिमणीवर कारखान्याचे गाळप तसेच सहवीज निर्मिती प्रकल्प चालायचा. आता नव्याने चिमणी उभारावी लागेल.