सोलापूर- कोरोना प्रादुर्भावामुळे गेल्या सात महिन्यापासून पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर दर्शनासाठी बंद आहे. पण, अनलॉक चालू झाल्यापासून राज्यातून अनेक भाविक पंढरपूरला चंद्रभागा स्नान व विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी दाखल होत आहेत. मात्र, मंदिर दर्शनासाठी बंद असल्याने भाविक चंद्रभागेत स्नान करून नामदेव पायरीचे दर्शन घेत मंदिराचे कळसदर्शन घेऊन गावी परत जात आहेत.
माहिती देताना व्यापारी संतोष जाधव कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील एसटी आणि खासगी वाहतूक सुरू झाल्यामुळे अधिक महिन्यातील कमला एकादशीच्या निमित्ताने आज शेकडो वारकऱ्यांनी पंढरपुरात येऊन श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या कळसाचे दर्शन घेतले. तब्बल सात महिन्यानंतर मंदिर परिसरात आज भाविकांची गर्दी झाली. मास्क आणि सोशल डिस्टन्सचे पालन करत वारकऱ्यांनी टाळ मृदंगाच्या गजरात नगरप्रदक्षिणा केली.
दर तीन वर्षातून एकदा येणारा अधिक महिना सध्या सुरू आहे. या महिन्यात तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी जाऊन दर्शन घेण्यासाठी भाविक गर्दी करतात. परंतु, कोरोनाच्या भितीमुळे १७ मार्चपासून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर भाविकांसाठी बंद आहे. मार्चपासून भाविक येणे बंद असल्याने मंदिर परिसरातील फुल विक्रेते, तुळशीमाळा, चुरमुरे, बत्तासे, पेढे विक्रेत्यांसह प्रासादिक वस्तुंचे व्यापारी अडचणीत आले आहेत. मंदिर समितीला भाविकांच्या देणगीच्या माध्यमातून मिळणारे उत्पन्न बंद आहे.
सध्या अधिकमास असल्याने विठ्ठल-रुक्मिणी पदस्पर्श, मुखदर्शन होत नाही. मात्र, वारकरी भाविक पंढरपूरची वारी चुकू न देता पंढरपूरला येताना दिसून येत आहे. भाविक चंद्रभागेत स्नान करून नामदेव पायरीचे दर्शन घेऊन मंदिराचे कळसदर्शन घेत गावी जात आहेत. लॉकडाऊन हळूहळू शिथिल केले जात आहे. विठ्ठल मंदिर परिसरातील दुकाने आता खुली होत आहेत. व्यापारी वर्गाची वर्दळ होत आहे. यामुळे पंढरपुरात दिलासादायक चित्र दिसत आहे.
हेही वाचा-पंढरपुरात दूध डेअरी चालकाला सव्वा दोन लाखाचा दंड; दूधात केमिकलचा वापर