पंढरपूर (सोलापूर) - ख्रिसमस सण आणि मोक्षदा एकादशीचा योग साधत काही भाविकांनी गर्दी पाहायला मिळाली. पंढरीत भाविक काल (गुरुवारी) रात्रीच मुक्कामी दाखल झाले होते. तर काही भाविक पहाटेपासूनच पंढरीत आले होते. त्यामुळे स्टेशन रस्ता, शिवाजी चौक, भक्तीमार्ग, चंद्रभागा वाळवंटात भाविकांची गर्दी झाली होती. या गर्दीमध्ये कोणत्याही प्रकारचे कोरोना नियमांचे पालन न झाल्याचे दिसून आले.
कडाक्याच्या थंडीतील पवित्र स्नान झाल्यानंतर ऑनलाईन बुकींग केलेल्या भाविक दर्शनरांगेकडे मार्गस्थ झाले. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या संख्येत वाढ झाली आहे. मात्र, तीन हजार भाविकांना पांडुरंगाचे मुख दर्शन घेता आले.
पंढरीतील बाजारपेठ फुल्ली -
पंढरीत मोक्षदा एकादशीनिमित्त गर्दी वाढल्याने ज्या भाविकांचे ऑनलाईन दर्शन बुकिंग नव्हते, त्यांनी मुखदर्शन, नामदेव पायरी दर्शन घेतले. विठू माऊलीचे नामस्मरण केले. सावळ्या विठूरायाचे दर्शन घेऊन धन्य झाल्यानंतर परत गावाकडे जाणाऱ्या वारकऱ्यांनी मिठाईच्या दुकानांत गर्दी केली. अनेक भाविकांनी प्रसाद म्हणून पेढे, चिरमुरे, बत्ताशे, हळदी, कुंकू, बुक्का खरेदी केला. तसेच घरातील बाळगोपाळांसाठी खेळणी घेतली. महिला भाविकांनी समई, पणत्या, पंचपाळा यांसह संसारिक साहित्याची खरेदी केल्याचे दिसून आले. कोरोना महामारीमुळे सात महिने विठ्ठल मंदिर बंद होते. मंदिर परिसरातील दुकानाची आर्थिक घडी विस्कळीत झाली होती. दोन महिन्यापासून विठ्ठल मंदिर दर्शनासाठी खुले झाल्यामुळे दुकानाची आर्थिक घडी पूर्वपदावर येताना दिसत आहे.