पंढरपूर Devendra Fadnavis : पंढरपूर येथील कार्तिकी एकादशीचा सोहळा गुरुवारी (२३ नोव्हेंबर) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पहाटे २ वाजता संपन्न होणार आहे. या महापूजेसाठी देवेंद्र फडणवीस बुधवारी पंढरपूर येथील शासकीय विश्रामगृहात दाखल झाले.
विठ्ठलाकडे 'हे' मागणं मागणार : फडणवीस शासकीय विश्रामगृहात आल्यानंतर त्यांनी तेथे विविध कार्यक्रमांना उपस्थिती लावली. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना, "मी इथे १२ कोटी जनतेचा प्रतिनिधी म्हणून सेवा करण्यास आलो आहे", असं ते म्हणाले. समस्या अनेक आहेत. त्यामुळे सर्वांच्या मनोकामना आम्हाला पूर्ण करता याव्यात, हे मागणं विठ्ठलाकडे मागणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
मनोज जरांगेंच्या निर्णयाचं स्वागत : पुढे बोलताना फडणवीस यांनी, मनोज जरांगे-पाटील यांनी घेतलेल्या निर्णयाचं स्वागत करत असल्याचं सांगितलं. शेतकरी नेते राजू शेट्टी गुरुवारपासून आंदोलन सुरू करणार आहेत. त्या संदर्भात बोलताना फडणवीस म्हणाले की, "शेतकऱ्यांना जास्तीचं मिळालं पाहिजे, मात्र त्यातील प्रॅक्टिकल अडचण समजून घ्यायला हवी". या आंदोलनावर सहकारमंत्री मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करत असल्याचंही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना सांगितलं.