पंढरपूर (सोलापूर) -महाविकास आघाडी सरकारने जनतेला भरमसाठ विजेचे बिल दिले आहे, त्याच प्रमाणे महाविकास आघाडी सरकारला मतदानाच्या रुपाने विजेचा शॉक देण्याचे आवाहन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूर येथे झालेल्या भाजप कार्यकर्ता मेळाव्यात केले.
येथील श्रीयश सभागृहात भाजपाचे पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार संग्राम देशमुख आणि शिक्षक मतदार संघाचे उमेदवार जितेंद्र पवार यांच्या प्रचारासाठी कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला.
प्रचारसभेत बोलताना देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते फडणवीस म्हणाले, पदवीधर व शिक्षक मतदारसंघात का महत्वाचे आहेत असा प्रश्न उपस्थित करतात, मात्र सोलापूर जिल्ह्यातील सत्तर टक्के पदवीधर किंवा शिक्षकांचा व्यवसाय शेती आहे. ज्या सर्वसामान्य माणसाच्या समस्या आहेत, त्याच आजच्या पदवीधर युवकांच्या समस्या आहेत, त्यामुळेच पदवीधर व शिक्षक मतदारसंघ तेवढेच महत्त्वाचे आहेत. पदवीधर युवकांनी आपला असंतोष तो मतदान पेटीच्या रूपाने दाखवा, असे आवाहन त्यांनी युवकांना केले.
पदवीधर व शिक्षकांनी मतदान करताना विशेष काळजी घ्यावी, कारण पदवीधर व शिक्षक मतदारसंघाची निवडणूक ही पूर्णतः वेगळी आहे. त्यामुळे शिक्षकांनी व पदवीधरांनी आपले मत वाया जाणार नाही, याची काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
वीज बिलाबाबत सरकारकडून दिशाभूल -
महाविकास आघाडी सरकार वीज बिलाबाबत लोकांची दिशाभूल करत आहे. आधी सरकारने सांगितले वीज बिल कमी करू, त्यानंतर सरकारमधील मंत्री म्हणतात आम्ही चुकून ती घोषणा केली होती. आता मंत्री सांगतात तुम्ही वीज वापरली आहे, मग बिल तर भरले पाहिजे. ज्या लोकांची वीज बिल भरण्याची ऐपत नाही, त्यांनी कुठून भरायचे बिल, असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला.
पंढरपूर येथे झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये आमदार गोपीचंद पडळकर, जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, माजी मंत्री सुभाष देशमुख, लक्ष्मणराव ढोबळे, माजी खासदार मुन्ना महाडिक यांनी आपल्या शैलीतून महाविकास आघाडी सरकारला चांगलेच धारेवर धरत टीका केली. यावेळी खासदार रणजितसिंह निंबाळकर, खासदार जय सिद्धेश्वर स्वामी, आमदार प्रशांंत परिचारक, आमदार राम सातपुते, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, धैर्यशील मोहिते-पाटील, संग्रामसिंह देशमुख, जितेंद्र पवार, माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, प्रणव परिचारक यांच्यासह असंख्य कार्यकर्तेे उपस्थित होते.