पंढरपूर - शहर व आसपासच्या 9 गावांमध्ये राज्य सरकारकडून आषाढीच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू केली आहे. ही संचारबंदी कमी करावी अशी मागणी येथील नागरिकांकडून होत आहे. संचारबंदीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा करून, संचार बंदीबाबत शिथिलता आणण्यासाठी भेट घेणार असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे.
आषाढी काळातील संचार बंदीबाबत मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांशी बोलणार असल्याची माहिती सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. ते पत्रकारांशी बोलत होते. 'संचार बंदीबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय घ्यावा'
कोरोना पार्श्वभूमीवर आषाढी एकादशी सोहळा होत आहे. त्यामुळे राज्य शासनाकडून प्रातिनिधिक स्वरूपातील आषाढी यात्रा करण्याची परवानगी प्रशासनाला दिली आहे. मात्र, प्रशासनाकडून 17 जुलै ते 25 जुलैपर्यंत पंढरपूर शहर व नऊ गावांमध्ये संचारबंदी लागू केली आहे. ही संचारबंदी नऊ दिवसाची असणार आहे. त्यामुळे पंढरपूर शहरातील व्यापारी व नागरिकांकडून याला विरोध होत आहे. संचारबंदी तीन किंवा चार दिवसांची असावी, आशी मागणी व्यापार्यांकडून होत आहे. त्यावर पालकमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, संचार बंदीबाबत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते यांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा, संचार बंदीच्या काळात नागरिकांना कशाप्रकारे दिलासा देता येईल, यावर विचार करावा, अशा सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या आहेत.
नगर परिषदेकडून पंढरपूर शहरातील भाडेपट्टी माफ करण्याची मागणी
कोरोना विषाणूचा संसर्ग गेल्या दोन वर्षापासून पंढरपूर शहरात वाढला आहे. त्यामुळे पंढरपूर शहरातील चार प्रमुख वाऱ्या व बारा एकादशी सोहळ्या दरम्यान शासनाकडून संचारबंदी लागू करण्यात आली होती. पंढरपूर हे वारीवर चालणारे गाव आहे. त्यामुळे व्यापारी व नागरिकांची आर्थिक परिस्थिती नाजूक झाली आहे. तरी गेल्या आषाढी वारीला राज्य शासनाकडून पाच कोटी रुपयांचा विकास निधी देण्यात आला आहे. तो अद्यापही नगरपरिषदेकडून खर्च करण्यात आलेला नाही. तसेच, येत्या आषाढी वारीसाठी नगरपरिषदेसाठी पाच कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. तो सर्व मिळून पंढरपूर शहरातील खान पट्टी माफी करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे.
आढावा बेठकीस पदाधिकारी उपस्थित
पांडुरंगाच्या आषाढी यात्रा काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यासंदर्भात दत्तात्रय भरणे यांनी आढावा बैठक घेतली यावेळी आमदार प्रशांत परिचारक, आमदार समाधान अवताडे, जिल्हा परिषद अध्यक्ष कांबळे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, राष्ट्रवादीचे नेते भगीरथ भालके, प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्यासह अनेक अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.