सोलापूर- विठू नामाच्या गजरात तसेच पर्यावरण वाचवा, मुली वाचवा आणि सोबतच व्यसन मुक्तीचा सामाजिक संदेश देत नाशिकहून निघालेली सायकल दिंडी आज सकाळी पंढरपुरात दाखल झाली. या सायकल दिंडीचे हे 8 वे वर्ष आहे.
आषाढी वारी : नाशिकहून निघालेली सायकल वारी पंढरीत दाखल
ही सायकल दिंडी 3 दिवसापूर्वी नाशिक येथील पर्यावरण प्रेमी आणि सायकलिस्ट असोसिएशनच्या वतीने नाशिक ते पंढरपूर, अशी काढण्यात आली होती.
ही सायकल दिंडी 3 दिवसापूर्वी नाशिक येथील पर्यावरण प्रेमी आणि सायकलिस्ट असोसिएशनच्या वतीने नाशिक ते पंढरपूर, अशी काढण्यात आली होती. सुमारे 370 किलोमीटर अंतराचा सायकल प्रवास करत 700 वारकऱ्यांची ही सायकल दिंडी आज पंढरीत मोठ्या उत्साहात दाखल झाली.
सायकल दिंडी पंढरपूरात दाखल झाल्यानंतर भटुंबरे चौक येथील खेडलेकर मठामध्ये सायकल दिंडीने सायकलीचे गोल रिंगण केले. या दिंडीत काही महिला व अंध सायकलपटू देखील सहभागी झाले होते. पंढरीत पोहचल्यानंतर सर्व सायकल दिंडीतील भाविकांनी विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर वारी सुखरुप झाल्याचे समाधान व्यक्त केले. तसेच सायकल दिंडीतील तरुण सायकलिस्ट प्रेम निफाडे याचे 2 दिवसापूर्वी दुर्देवी निधन झाल्यामुळे सर्व सायकलिस्टतर्फे यावेळी श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.