पंढरपूर :सोलापूर जिल्ह्यातील 5 तालुक्यात सोमवारपासून (23 ऑगस्ट) संचारबंदी निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. तर व्यापाऱ्यांना सोमवारपासून सकाळी सात ते दुपारी चार वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहे. मात्र ग्रामीण भागातील कोरोना परिस्थितीबाबत जिल्हाधिकारी शंभरकर यांनी चिंता व्यक्त केली आहे. ज्या गावात कोरोनाचे जास्त रुग्ण आहेत, त्या गावात निर्बंध कडक ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
पाच तालुक्यात सोमवारपासून निर्बंध शिथिल
सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, माळशिरस, करमाळा, माढा आणि सांगोला या 5 तालुक्यात 13 ऑगस्टपासून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली होती. संचारबंदी 23 ऑगस्टपर्यंत असणार आहे. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सोमवारपासून नवीन नियमावली लागू केली आहे. यामध्ये पंढरपूरसह 5 तालुक्यांमध्ये बाजारपेठ सकाळी 7 ते दुपारी 4 वाजेपर्यंत खुली ठेवण्याची परवानगी जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. याबाबत पंढरपूर शहरातील व्यापाऱ्यांनी आनंद व्यक्त केला.
10 दिवसाच्या संचारबंदीनंतरही कोरोना परिस्थिती जैसे थे
संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका निर्माण होऊ नये म्हणून पंढरपूर, सांगोला, माळशिरस, माढा, करमाळा या तालुक्यांमध्ये जिल्हा प्रशासनाकडून 10 दिवसांची संचारबंदी लागू करण्यात आली होती. मात्र 10 दिवसाच्या संचारबंदी नंतर पाच तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या कोणत्याही प्रकारची घट झाल्याचे दिसून आले नाही. जिल्हा प्रशासनाकडून संचारबंदी योग्य नियोजन न केल्यामुळे कोरोना साखळी तोडण्यास जिल्हा प्रशासनाला अपयश आल्याचे सांगण्यात येत आहे.