सोलापूर - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरचा आषाढी वारीचा सोहळा रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे वारकऱ्यांना पंढरपुरात येणास बंदी घालण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पंढरपूरात 2 जुलैपर्यंत संचारबंदी करत असल्याची आज (सोमवार) घोषणा केली. पंढरपूर व परिसरातील 10 गावांमध्ये 30 जून ते 2 जुलैपर्यंत ही संचारबंदी असल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली.
वैद्यकीय कारणासाठी व अन्य कारणासाठी पोलीस परवानगी घेऊन जाता येईल,असे अधिक्षक मनोज पाटील यांनी स्पष्ट केले आहे. 1 जुलै रोजी संतांच्या 9 पालख्या व दुसऱ्या दिवशी मठाचे मानकरी यांना पूजा व नैवेद्यसाठी परवानगी देण्यात आली आहे. पालख्यांचे आगमन 30 जून रोजी होणार आहे. संचारबंदीच्या काळात नदीमध्ये स्नानासाठी कोणीही येऊ नये, असे आवाहन केले आहे. त्याचबरोबर दर्शन व कळस दर्शनासाठी भाविकांनी घराबाहेर येऊ नये.
1 जुलैला पहाटे शासकीय महापूजा होणार आहे. ज्यांना पास दिले आहेत त्यांनीच या पुजेला उपस्थित राहावे, असे आवाहन पोलीस अधीक्षकांनी केले आहे. आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली.