पंढरपूर (सोलापूर) - कार्तिक वारी यात्रेच्या पार्श्वभूमीवर कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पंढरपूर शहर व आसपासच्या नऊ गावांमध्ये मंगळवार (दि. 24 नोव्हेंबर) मध्यरात्री 12.00 वाजल्यापासून ते 26 नोव्हेंबरच्या रात्री 12.00 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सोमवारी (दि. 23 नोव्हेंबर) जारी केले.
कार्तिक वारीसाठी राज्यभरातून भाविक पंढरपुरात येत असतात. वारी कालावधीत पंढरपुरात भाविकांची गर्दी होऊन कोरोनाचा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणात वाढू शकतो. सार्वजनिक हिताच्या दृष्टीने, संसर्ग टाळण्यासाठी प्रशासनाने पंढरपूर शहरात आणि शहराच्या आजूबाजूला असलेल्या भाटुंबरे, चिंचोळी भोसे, शेगाव दुमाला, लक्ष्मी टाकळी, गोपाळपूर, वाखरी, कोर्टी, गादेगाव-शिरढोण, आणि कौठाळी या ग्रामपंचायत 144 अंतर्गत संचारबंदीचे आदेश जारी केले आहेत.
- संचारबंदीतून यांना आपणास सूट
- अत्यावश्यक वैद्यकीय सेवा पुरविणारी खासगी व सरकारी रूग्णालये, आरोग्य सेवा देणारे डॉक्टर व वैद्यकीय सेवेशी संबंधित कर्मचारी आणि त्यांची वाहने.
- रुग्णालय सेवा व सारी, आयएलआय व कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसंदर्भात सर्वेक्षण करणारे कर्मचारी.
- जीवनाश्यक सेवेतील आस्थापना
- मंदिर समिती पंढरपूर यांच्याकडील पासधारक अधिकारी
- कर्तव्यावर असणारे महसूल, पोलीस, पाणीपुरवठा, अग्निशमक, विद्युत पुरवठा विभागातील शासकीय अधिकारी.
- पोलीस बंदोबस्तासाठी भोजनालय, पाणीपुरवठा सुविधा पुरवणाऱ्या यंत्रणा.
- कार्तिकवारी कालावधीमध्ये परंपरेनुसार साजरे होणाऱ्या उत्सवांना स्थानिक परिस्थितीनुरसार परवानगी देण्याचे अधिकारी राखून ठेवण्यात येत आहे.