महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कसला कोरोना अन् कसली जमावबंदी; सोलापूर मार्केट यार्डात गर्दीच गर्दी

'ब्रेक द चेन' अंतर्गत कोरोना रोखण्यासाठीची मोहिम आजपासून (सोमवार ) सुरू होत आहे. याबाबतचे नियम लागू होत आहेत. मात्र, सोलापुरच्या मार्केट यार्डात शेतकरी आणि व्यापाऱ्यांची तूफान गर्दी पाहायला मिळाली.

solapur
सोलापूर

By

Published : Apr 5, 2021, 1:31 PM IST

सोलापूर :कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे महाराष्ट्राची चिंता वाढली आहे. नागरिकही कोरोना नियमांचे पालन करताना दिसत नाहीत. सोलापूर-कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणजेच मार्केट यार्डात सोशल डिस्टन्सचा पार फज्जा उडाला. शेतकरी आणि व्यापारी यांना कोरोनाची जराही भीती नसल्याचे चित्र आज (5 एप्रिल) पाहावयास मिळाले. शुक्रवारपासून बंद असलेल्या मार्केट यार्डात आज सकाळपासून मोठी गर्दी झाली होती. आपल्या मालाला योग्य भाव मिळाला पाहिजे, यासाठी शेतकरी वर्गाची लगबग दिसून आली. कोरोना होईल या भीतीमुळे सरकार वेगवेगळे नियम लादत आहे. तर, शेतकरी बांधवांना कोरोनाची भीती नसून शेतात पिकविलेल्या मालाला योग्य भाव मिळणार की नाही? याची काळजी त्यांना लागली आहे.

सोलापूर मार्केट यार्डात तूफान गर्दी

म्हणून मार्केट यार्डात गर्दी

शुक्रवारपासून सलग तीन दिवस सुट्टी असल्याने मार्केट यार्डात शुकशुकाट होता. आज सकाळी 6 वाजल्यापासून शेतकऱ्यांची वाहने येऊ लागली. त्यामध्ये भाजीपाला, टोमॅटो, फुलं, कांदा आदी माल घेऊन शेतकरी बांधव मार्केट यार्डात दाखल झाले. शेतकरी मोठ्या प्रमाणात दाखल होत असल्याने मार्केट यार्डातील व्यापारी देखील निलावासाठी सज्ज होते. यामुळे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत गर्दीच गर्दी पाहावयास मिळाली.

लॉकडाऊनच्या भीतीमुळे 350 ट्रक कांद्याची आवक

लॉकडाऊन लागेल या भीतीपोटी सोलापूर मार्केट यार्डात 350 ट्रक कांद्याची आवक झाली. त्यामुळेच कांद्याला दर प्रति क्विंटल 300 ते 1400 रूपये मिळाला. पुणे, नगर आणि कर्नाटक येथील कांदा सोलापूर मार्केट यार्डात दाखल झाला होता. लॉकडाऊनच्या भीतीपोटी शेतकरी बांधव आपला शेतमाल घेऊन मार्केट यार्डात दाखल होत आहेत.

सरकारची 'ब्रेक द चेन' नियमावली पायदळी

रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी 'ब्रेक द चेन' अंतर्गत नवीन आणि कडक नियमावली जाहीर केली आहे. या नियमावली अंतर्गत गर्दीचे ठिकाण पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्यात विकेंड लॉकडाऊन लागू केला आहे. रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. ही नियमावली आजपासून लागू होत आहे. मात्र, राज्य शासनाने जाहीर केलेल्या नियमावलीच्या पहिल्याच दिवशी सोलापूर मार्केट यार्डात गर्दी पाहावयास मिळाली.

हेही वाचा -अक्षयनंतर 'राम सेतू'च्या ४५ क्रू मेंबर्सना कोरोनाची लागण, शूटिंग अनिश्चित काळासाठी स्थगित

हेही वाचा -स्पेशल रिपोर्ट : दादर भाजी मार्केटमध्ये कोरोना नियमांना हरताळ

ABOUT THE AUTHOR

...view details