पंढरपूर - नववर्ष तसेच सलग असलेल्या सुट्यांमुळे भाविकांनी पंढरपुरात गर्दी केली आहे. पहाटेपासून भाविक पंढरपुरात विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी दाखल होत आहेत. त्यामुळे स्टेशन रस्ता, शिवाजी चौक, भक्तीमार्ग आणि चंद्रभागा वाळवंटात गर्दी पाहायला मिळत आहे. मात्र भाविक कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणतीही खबरदारी घेताना दिसत नाही. कडाक्याच्या थंडीत पवित्र स्नान झाल्यानंतर ऑनलाईन बुकींग केलेल्या भाविकांनी पाहाटेपासून दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत.
ऑनलाईन बुकींगची संख्या वाढवण्याची मागणी
नवीन वर्षानिमित्त पंढरपुरात भाविकांची गर्दी वाढत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दर्शनासाठी ऑनलाईन नोंदणी आवश्यक आहे. मात्र जे भाविक ऑनलाईन नोंदणी करू शकले नाही, त्यांनी बाहेरूनच विठ्ठल आणि नामदेव पायरीचे दर्शन घेतले. विठ्ठल मंदिर समितीकडून विठूरायाच्या दर्शनासाठी दिवसाला 4800 भाविकांना ऑनलाइन दर्शनाची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे अनेकांना दर्शन न घेताच माघारी फिरावे लागत असल्याने, ऑनलाईन बुकींगची संख्या वाढवावी अशी मागणी भाविकांनी केली आहे. अनेकांनी बाहेरूनच विठ्ठलाचे दर्शन घेतले.