माळशिरस (सोलापूर) -तौक्ते चक्रीवादळामुळे सोलापूर जिल्ह्यातील वातावरणात अचानक बदल होऊन शनिवारी (दि. 15 मे) सायंकाळी जोरदार पाऊस झाला. मात्र, यामुळे फळ शेतीचे मोठे नुकसान केले आहे. पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला, माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांची नुकसान झाले आहे. पावसामुळे नुकसान झालेल्या शेती बागाचे लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी माळशिरस स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून करण्यात आली आहे.
मान्सूनपूर्व पावसामुळे माळशिरस तालुक्यातील फळबागांचे नुकसान
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे राज्यात एक जूनपर्यंत सरकारने संचारबंदी लागू केली आहे. राज्यातील सर्व बाजारपेठा राज्य सरकारने बंद ठेवल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीमालाला कोणत्याही प्रकारची भाव मिळताना दिसत नाही. त्यातच मान्सूनपूर्व पावसाने माळशिरस तालुक्यात शनिवारी अचानक हजेरी लावली. त्यामुळे तालुक्यातील केळी, डाळिंब, द्राक्षे, पपई या फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे. कोरोनामुळे आधीच मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्याला मोठा आर्थिक फटका बसत आहे. माळशिरस तालुक्यातील विजयवाडी येथील शेतकऱ्याने साडेतीन एकर शेत जमिनीवर केळी बागाची लागवड केली होती. मात्र, शनिवारी आलेल्या पावसामुळे केळी बाग पूर्णपणे झोपल्याचे दिसून आले. त्यामुळे हातातोंडाशी आलेल्या केळी बागाचे नुकसान झाल्याने शेतकरी हताश झाला आहे.
पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा तालुक्यातील द्राक्ष व डाळिंब बागांची पडझड