सोलापूर-अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पीकविमा मिळण्याचे निकष थोडे किचकट आहेत,परंतु बैठका घेऊन मार्ग काढू, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोलापूर दौऱ्यावर असताना सांगितले. तसेच सोलापुरात झालेली अतिवृष्टी आणि त्यानंतर ओढ्याना व नाल्यांना आलेला पूर हे अतिक्रमणमुळे आले आहे आणि ओढ्यांत व नाल्यांत अतिक्रमण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली. जिल्ह्यातील पूर स्थिती आणि कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी पंढरपूर व सोलापूरच्या दौऱ्यावर आहे. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.
सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतः सोलापूर दौरा करणार आहेत, त्यावेळी सहायता निधी किंवा मदत निधी घोषित करतील, असे अजित पवार यांनी स्पष्टपणे सांगितले. तसेच पीक विमा देताना इन्शुरन्स कंपनीच्या नियमांमध्ये किचकटपणा आहे. त्यावर योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे सांगितले. त्यासाठी केंद्राची भरपूर मदत लागणार आहे. केंद्रीय पथकाने यावे आणि आणि राज्यातील पूरग्रस्त भागाचा सर्वे करावा आणि त्यामुळे नुकसानीचा अंदाज येईल, मुख्यमंत्री स्वतः येतील आणि जे काही मदत असेल ते स्वतः जाहीर करतील, असेही उपमुख्यमंत्री पवार म्हणाले.