सोलापूर - यंदाच्या वर्षी नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) हंगामाची सुरुवात दमदार झाली आहे. हंगामातील पहिला महिना असलेल्या जून महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात राज्यात २५१.४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामुळे आनंदी असलेल्या बहुतांश शेतकऱ्यांनी जूनच्या सुरूवातीला खरिपांच्या पिकांची पेरणी केली. सध्या पिके अंकुरली असून, काही भागांत अधूनमधून पडणाऱ्या हलक्या पावसाने ही पिके तग धरून आहेत. तर काही भागाच्या कोरडवाहू जमिनीतील पिकांची अवस्था बिकट आहे. त्यात जूनच्या शेवटच्या पंधरवड्यात पावसाने दडी मारली. यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे. या दरम्यान, एका वयोवृद्ध जोडप्याचा, दुबार पेरणी करतानाचा व्हिडिओ सद्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
सोलापूर जिल्ह्याच्या बार्शी तालुक्यातील धामणगावचे नरहरी ढेकणे आणि सोजर ढेकणे या वयोवृद्ध जोडप्याचा हा व्हिडिओ आहे. नरहरी यांचे वय 80 च्या घरात तर सोजरकाकू या 70 च्या आहेत. ढेकणे दाम्पत्यांना मुलबाळ नाहीत. ते शेतीवर उदरनिर्वाह करतात. त्यांच्याकडे ना गाडी आहे ना बैलजोडी. त्यांनी सुरूवातीचा पाऊस झाल्यानंतर, कसेबसे पैसे जमवून खरिपांच्या पिकाची पेरणी केली. पण पावसाने दडी मारली आणि त्यांच्यावर दुबार पेरणीची वेळ आली. तेव्हा ढेकणे दाम्पत्याकडे दुबार पेरणीसाठी पैसे नव्हते. तेव्हा त्यांनी स्वत:च तिफण जुपून पेरणी केली. नेमका हा क्षण संवेदनशील माणसाने त्यांच्या मोबाईलमध्ये टिपला. सद्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.