सोलापूर - शहराच्या प्रवेश द्वारावर सुरू असलेला मटक्याच्या अड्डा शहर गुन्हे शाखेने उध्वस्त केला आहे. वैष्णवी हाईट्स या इमारतीमध्ये मटका खेळला जात होता. या कारवाईत 6 संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच आरोपींकडून 5 लाख 48 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सोलापूर- शहराच्या प्रवेश द्वारावरच मटक्याच्या आकड्यांचा खेळ सुरू होता. याची कुणकुण लागताच गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने गुरुवारी मध्यरात्री कारवाई करत सहा संशयित आरोपींना अटक केली. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात सुनील कामाठी मटका व जुगार अड्डा कारवाईमुळे शहर हादरले होते. आता पुन्हा एकदा हा मटक्याच्या विषय समोर आला आहे.
अशी केली कारवाई-
सोलापूर शहर गुन्हे शाखेने गुरुवारी मध्य रात्रीच्या सुमारास बाळे येथील वैष्णवी हाईट्स या इमारतीमध्ये धाड टाकली. यावेळी तिथे कल्याण आणि मुंबई नावाचा मटका व्यवसाय सुरू होता. काही इसम मोबाईलद्वारे मटक्याचे आकड्यांचा हिशोब करत होते. तसेच आकडेमोड केलेल्या चिठ्ठ्या त्या ठिकाणी पडलेल्या होत्या. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सर्व मुद्देमाल जप्त करून चौकशी सुरू केली. गेल्या अनेक दिवसांपासून हा अवैध व्यवसाय सुरू होता.