सोलापूर - दिवाळीच्या सणात फटक्याची आतिषबाजी होते. यातून लोकांना जरी आनंद मिळत असला तरी मुक्या जनावरांवर त्याचा परिणाम होतो. हीच गोष्ट ध्यानात ठेवून पंढरपूर तालुक्यातील चिंचणी गावातील ग्रामस्थांनी यंदा फटके विरहित दिवाळी साजरी केली आहे.
प्रतिक्रिया देताना गावातील विद्यार्थी यंदाच्या दिवाळीत चिंचणी गावात एकही फटका फोडण्यात आला नाही. फटाके न फोडता या संपूर्ण गावाने दिवाळी साजरी केली. विशेष म्हणजे, गावातील चिमुकल्यांनी देखील गावात फटाके न फोडण्याच्या निर्णयाचे स्वागत करत फटाके विरहीत दिवाळी साजरी केली. चिंचणी गावात काही वर्षापूर्वी फटाक्यांच्या आवाजामुळे पाळीव कुत्र्यांसह पक्षांचा मृत्यू झाला होता. दिवाळीच्या काळात सलग चार ते पाच दिवस फटाके फूटत असल्यामुळे दुभती जनावरे भेदरली आणि त्यामुळे काही जनावरांनी दूध द्यायचे बंद केले होते. त्याचबरोबर, शेळ्या देखील भेदरून गेल्याचे विदारक चित्र गावातील गावकऱ्यांना पाहायला मिळाले होते.
दिवाळीच्या सणात फोडल्या जाणाऱ्या फटाक्यांमुळे पाळिव प्राण्यांबरोबरच पशू-पक्षांवर विपरीत परिणाम होतो याची जाणीव ग्रामस्थांना झाली. त्यामुळे यापुढे दिवाळीच्या सणात गावात एकही फटाका वाजवायचा नाही, असा निर्णय ग्रामस्थांनी घेतला. त्यामुळे या वर्षीच्या दिवाळीत चिंचणी या गावात एकही फटाका वाजला नाही.
मोठ्या आवाजाचे फटाके उडविण्यावर न्यायालयाने बंदी घातली आहे. न्यायालयाने मोठे फटाके फोडण्यावर बंदी घातली असली तरी सर्रासपणे अशी फटाके फोडल्या जात असल्याचे चित्र सगळीकडे पाहायला मिळते. मात्र, दिवाळीच्या काळात आपल्या काही क्षणांच्या आनंदासाठी गाव शिवारातील पशू-पक्षांना त्रास होतो. त्यामुळे पशू पक्षांना होणारा त्रास थांबविण्यासाठी चिंचणी गावातील लोकांनी फटाके न फोडण्याचे पाऊल उचलले. त्यांचे हे पाऊल संपूर्ण राज्यासाठी प्रेरणादायी आणि आदर्श निर्माण करणारे आहे.
हेही वाचा-दिवाळी विशेष : पंढरपुरात साकारली म्हैसुर पॅलेसची प्रतिकृती