पंढरपूर (सोलापूर) - पहिल्या व दुसऱ्या लाटेत कोविड केअर सेंटरमध्ये कोरोना योद्धे म्हणून काम करणारे डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी पंढरपुरात लाक्षणिक उपोषण केले. राज्य सरकारने 2 जुलैपासून कोरोना काळात काम करणाऱ्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले. त्यामुळे कोरोना महामारीत काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना आरोग्य सेवेमध्ये पुन्हा सामावून घ्यावे, अशा मागणीसाठी महामारी योद्धा संघर्ष समितीच्या वतीने लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
कोरोना योद्ध्यांच्या मागण्या
पंढरपूर येथील कोविड केअर सेंटरमधील डॉक्टर, कर्मचाऱ्यांनी लाक्षणिक उपोषण सुरू केले आहे. शहरातील गजानन महाराज मठ येथील कोरोना केअर सेंटरसमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले. 'कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेमध्ये जीवाची परवा न करता कोरोना योद्धे म्हणून कोविड केअर सेंटरमध्ये काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना सरकारी सेवेत सामावून घ्यावे. डॉक्टर, आरोग्य कर्मचारी व सफाई कर्मचाऱ्यांना शासनाने कमी करू नये', अशा विविध मागण्या महामारी योद्धा संघर्ष समितीने केल्या आहेत.