बार्शी ( सोलापूर)तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. वाढत्या कोरोना प्रादुर्भाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 15 दिवसांसाठी राज्यात कडक निर्बंधांची घोषणा केली आहे. मात्र तरी देखील नागरिक विनाकारण घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे अशा नागरिकांना चाप लावण्यासाठी बार्शी नगरपालिकेकडून बाहेर फिरणाऱ्या नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे. जे नागरिक कोरोना चाचणीमध्ये पॉझिटिव्ह आढळून येतील त्यांची रवानगी कोविड सेंटरमध्ये करण्यात येणार आहे.
सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक कोरोना रुग्ण हे बार्शी तालुक्यात आढळून येत आहेत. सद्यस्थितीत 500 हुन अधिक रुग्णांवर उपचार सुरू आहेत. याकरिता शहरात 8 कोविड सेंटर उभारण्यात आले आहेत. शिवाय शासन निर्णयाची अंमलबजावणी व्हावी याकरिता नगरपालिका आणि पोलीस यंत्रणा तैनात आहे. असे असतानाही शहरातील पांडे चौक, भाजी मंडई या भागात नागरिकांची गर्दी होत आहे. संचारबंदीच्या सुरुवातीला चौकाचौकात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मात्र, नागरिक हे विनाकारण घराबहेर पडत असल्याचे चित्र कायम आहे. त्यामुळेच आता विनाकारण बाहेर फिरणाऱ्या नागरिकांची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.
शहरातील विविध भागात नागरिकांची कोरोना चाचणी