सोलापूर - कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या 100 पेक्षा जास्त नागरिकांची कोरोना तपासणी करण्यात आली आहे. ही संख्या जास्त असल्यामुळे आज सायंकाळपर्यंत सर्वांचे रिपोर्ट येतील, अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.
मृत कोरोनाबाधिताच्या संपर्कात आलेल्या सर्वांची तपासणी शनिवारी सोलापुरात कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाला. यानंतर त्याच्याशी थेट संबंधित 91 जणांची आणि अन्य 30 जणांची माहिती गोळा करण्यात आली. त्यातील १०० जणांची कोरोना चाचणी घेण्यात आली आहे. इतरही वैद्यकीय नमुने घेण्याचे काम सरू आहे. हे सर्व अहवाल आज सांयकाळपर्यंत मिळणार आहेत. सद्यस्थितीत एकही कोरोना बाधित रुग्णाची नाही, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
सोलापुरात कोरोना चाचणी करणाऱ्या विभागात आत्तापर्यंत 362 जणांचे नमुने घेऊन चाचणी करण्यात आली आहे. त्यापैकी 259 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. उर्वरित एकशे दोन जणांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत. मृत्यू झालेल्या रुग्णाचा रहिवासी परिसर केंद्रबिंदू ठेवून एक किलोमीटर परिसरातील 7 हजार घरे आणि 43 हजार लोकसंख्येचे सर्वेक्षण कालपासून हाती घेण्यात आले आहे. महानगरपालिका आरोग्य विभागाची 60 पथके हे काम करत असून बुधवारी संध्याकाळपर्यंत हे काम पूर्ण होईल. 300 पोलीस या कामामध्ये आरोग्य प्रशासनाला मदत करत आहेत.
नागरिकांनी घाबरून जाऊ नये, सर्वेक्षणाला मदत करावी, अत्यावश्यक बाबी लागल्यास प्रशासनाने दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधावा, असेही आवाहन जिल्हाधिकाऱयांनी केले. लॉकडाऊन आणि संचारबंदीची मुदत 30 एप्रिल पर्यंत वाढवण्यात आली आहे. सोलापूर पोलिसांनी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा, अत्यावश्यक सेवा देणारे व्यक्ती, सेवाभावी संस्थांना विशेष परवाने दिले आहेत .