पंढरपूर (सोलापूर) -आषाढी एकादशीचा सोहळा अवघ्या काही दिवसांवर आला असताना कोरोनाने पंढरपुरात शिरकाव केला आहे. विठ्ठल मंदिर परिसरातील प्रदक्षिणा रोड भागात एक तर तालुक्यातील करकंब येथे एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळला आहे. त्यामुळे हा भाग कंटेनमेंट झोन करण्यात येणार आहे. यामुळे शहरात भीतीचे वातावरण तयार झाले आहे.
शहरातील प्रदक्षिणा मार्ग भागातील एका व्यक्तीची तीन दिवसांपूर्वी कोरोना तपासणी करण्यात आली होती. कोरोना रुग्ण हा प्रदक्षिणा मार्गावर राहत असल्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.
आजपासून तीन दिवसांनी आषाढी एकादशीचा सोहळा येथे होणार आहे. मानाच्या दिंडीसह वारकरी एकदशी दिवशी नगरप्रदक्षिणा करीत असतात. मात्र, प्रदक्षिणा परिसर हा कोरोना रुग्ण सापडल्याने प्रतिबंधित क्षेत्र म्हणून सील केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकदशीला नगर प्रदक्षिणा होणार का? याबाबत शंका निर्माण झाली आहे.
मागील पंधरा दिवसापासून पंढरपूर परिसर कोरोनामुक्त म्हणून जाहीर करण्यात आला होता. पंढरीतील सात कोरोना रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. मात्र, हा कोरोनाबाधित रुग्ण सापडल्यामुळे पंढरीतील कोरोनाबाधितांची संख्या 8 वर गेली आहे.
हा कोरोना रुग्ण पंढरीतील बऱ्याच नागरिकांच्या संपर्क आला आहे. हा रुग्ण एका सहकारी बँकेचा संचालक असल्याचे सांगण्यात येत आहे. तीन दिवसांपूर्वी रुग्णाच्या छातीत कफ आणि ताप असल्याचे आढळून आले होते. त्यामुळे त्याचा स्वॅब घेण्यात आला होता.स्वॅब तपासणीनंतर त्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. त्या कोरोनाबाधित रुग्णाला वाखरी येथील कोविड सेंटर मध्ये दाखल करण्यात येणार आहे. रुग्णाच्या संपर्कतील नागरिकांचा शोध प्रशासन घेत आहे.