सोलापूर -सोलापूर शहरासह जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी दोन सदस्यांचे केंद्रीय पथक काल गुरुवारी सोलापुरात दाखल झाले होते. पाच दिवस मुक्कामी राहून, अभ्यास करून ते प्रशासनाला योग्य त्या सूचना करणार होते. मात्र या पथकातील एका सदस्याला कोरोनाची लागण झाली आहे. याबाबत उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे यांनी महिती दिली आहे. डॉ. ए .जी. अलोन असे या कोरोना पॉझिटिव्ह सदस्याचे नाव आहे.
एक सदस्य पॉझिटिव्ह, तर दुसरा सदस्य क्वारंटाईन
जिल्ह्यात दररोज 500 हून अधिक कोरोना रुग्णांची भर पडत आहे. या कोरोना वाढिचा अभ्यास करण्यासाठी दोन सदस्यांचे केंद्रीय पथक पाच दिवसांसाठी सोलापूर दौऱ्यावर आले होते. मात्र पुण्यावरून वाहनातून येणाऱ्या या पथकाचा वाहनचालक गुरुवारी कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता. त्यानंतर त्या दोन सदस्यांची आज शुक्रवारी कोरोना टेस्ट घेण्यात आली. त्यापैकी एका सदस्याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यांच्यावर श्री छत्रपती शिवाजी महाराज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. तर दुसरे सदस्य डॉ. पियुष जैन हे होम क्वांरटाईन आहेत.