सोलापूर (पंढरपूर) -राज्यात कोरोना नियमात शिथिलता देण्यात येत आहे. तर, दुसरीकडे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंढरपूर शहरासह पाच तालुक्यात संचारबंदी लागू केली आहे. काही तालुक्यांमध्ये जिल्हा प्रशासनाकडून नियमांमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील 1243 गावांपैकी 687 गावांमध्ये एकाही कोरोनाबाधिताची नोंद नाही. त्यातील दहापेक्षा अधिक रुग्ण असलेले 118 गावे आहेत. तर, दहापेक्षा कमी असलेले 560 गावांचा समावेश असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली आहे.
'जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये संचारबंदी तर काही तालुक्यात शिथिलता'
सोलापूर जिल्ह्यातील कोरोनाच्या तिसऱ्या संभाव्य लाटेचा विचार करून जिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये कडक निर्बंध लागले आहेत. यामध्ये पंढरपूर, सांगोला, माळशिरस, माढा, करमाळा या तालुक्यात दहा दिवसाची संचारबंदी 13 ऑगस्टपसून लागू केली आहे. तर, उर्वरित तालुक्यांमध्ये कोरोना प्रादुर्भाव कमी आहे. त्यामुळे त्या तालुक्यात संचारबंदीमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. तरी जिल्हा प्रशासनाकडून कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. आरोग्य विभागाकडून कोरोना चाचणीवर भर दिला जात असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.