सोलापूर : संभाजी भिडे यांनी महात्मा गांधींबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे राज्यभर आंदोलने केली जात आहेत. राजकीय वर्तुळातही भिडे गुरुजींच्या त्या वक्तव्यामुळे दावे-प्रतिदाव्यांचे सत्र सुरुच आहे. संभाजी भिडे यांनी महात्मा गांधींचे वडील मुस्लिम जमीनदार असल्याचे वादग्रस्त विधान केले होते. त्यावरुन काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजपावर टीकास्त्र सोडले आहे. प्रणिती शिंदेंच्या नेतृत्वाखाली सोलापूर रेल्वे स्थानकासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी त्यांनी माध्यामांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला.
महात्मा गांधींचे फोटो काढून दाखवा : 'भाजपाच्या नेत्यांमध्ये हिम्मत असेल तर, त्यांनी सरकारी कार्यालयातील महात्मा गांधींचे फोटो काढून दाखवावे. एकीकडे त्यांचेच नेते विदेशात जाऊन महात्मा गांधींचे कौतुक करतात. आंतरराष्ट्रीय पातळीवर महात्मा गांधींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करतात. मात्र, देशात महात्मा गांधींचा अपमान केला जातो, असा हल्लाबोल शिंदे यांनी बाजपावर केला आहे. संभाजी भिडेंवर भाजपा सरकार कारवाई का करत नाहीत? असा सवाल देखील शिंदे यांनी उपस्थित केला आहे.
प्रणिती शिंदेंची भाजपावर सडकून टीका : आक्षेपार्ह, वादग्रस्त विधाने करून महापुरुषांचा अवमान करणाऱ्या लोकांना भाजपाने देशात सोडले आहे. त्यामुळे संभाजी भिडे यांच्यासारखे लोक वारंवार वादग्रस्त विधाने करत आहेत. त्यामुळे समाजात मोठी दरी निर्माण होत असल्याची खंत देखील शिंदे यांनी व्यक्त केली आहे. संभाजी भिडे यांना तात्काळ अटक झालीच पाहिजे अशी मागणी देखील त्यांनी केली. राज्यात खालच्या पातळीवर जाऊन भाजपाचे राजकारण सुरू असल्याची टीका प्रणिती शिंदे यांनी केली आहे.
संभाजी भिडेंवर कडक कारवाई करा : महात्मा गांधी भारताचे राष्ट्रपिता आहेत. देशातच नाही तर जगभरात त्यांच्या विचारांचा आदर्श घेतला जातो. त्यांना देशात मानाचे स्थान आहे. देशातील प्रत्येक सरकारी कार्यालयात त्यांचा फोटो आहे. भाजपा सरकारमध्ये जर हिंम्मत असेल तर त्यांनी सरकारी कार्यालयातील फोटो काढून दाखवावे असे आव्हान शिंदे यांनी दिले आहे. तुम्हाला महात्मा गांधींचे विचार पटत नसतील तर विदेशात जावे. राष्ट्रपितांविषयी आक्षेपार्ह, वादग्रस्त विधाने करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी प्रणिती शिंदे यांनी केली आहे.