सोलापूर - शेळगी येथील महिलेला व्याजाच्या पैशांसाठी कामाच्या ठिकाणी जाऊन शिवीगाळ करणे, जीवे मारण्याची धमकी देणे याप्रकरणी तीन खासगी सावकारांविरोधात तक्रार दाखल केली आहे. गिरीजा बनसोडे (रा. मंत्री चंडक,मुळेगाव रोड, सोलापूर) छाया संजय शिंदे ( रा. रामराज्य नगर, शेळगी, सोलापूर) युवराज शिवराज भोसले(रा. गौडगाव मठ, शेळगी, सोलापूर), अशी खासगी सावकारांची नावे आहेत.
शेळगी येथील जोशी गल्ली चौक येथे राहणाऱ्या राजश्री रमेश निराळे (वय 45) या महिलेने युवराज भोसलेकडून 3 मे 2019 ला मुलाच्या लग्नासाठी 75 हजार रुपये दरमहा 10 टक्के व्याज दराने रोख रक्कम घेतली होती. यासाठी युवराज भोसलेला 8 महिन्यांच्या व्याजाच्या स्वरुपात 60 हजार रुपये दिले असून आणखी 8 महिन्याचे व्याज व मुद्दल असे 1 लाख 35 हजार येणे बाकी आहे असे सागंत त्याने राजश्री यांच्याकडे पैशासाठी तगादा लावला.
तसेच राजश्री यांनी छाया शिंदेकडून मुलाच्या व्यवसायासाठी 2016 मध्ये 2 लाख रुपये व्याजाने घेतले होते. त्यापैकी काही रकमेला 5 टक्के व काही रकमेला 10 टक्के दरमहा असे व्याज आकारण्यात आले होते. राजश्री यांनी दीड वर्षापर्यंत 22 हजार दरमहा पैसे दिले तरीही आणखी 6 लाख रुपये व्याज व मुद्दल येणे बाकी आहे, असा तगादा लावत या महिला खासगी सावकाराने राजश्री यांना त्रास दिला असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा- लाकूड तस्करांचा वनपालावर प्राणघातक हल्ला; गुन्हा दाखल
तसेच मंत्री चंडक येथे राहणाऱ्या खासगी सावकार गिरीजा बनसोडेंकडून राजश्री यांनी 2002 मध्ये दरमहा 10 टक्के व्याज दराने 1 लाख रुपये रोख रक्कम घेतली होती. या रकमेसाठी त्यांनी गेल्या 18 वर्षांपासून 10 टक्के व्याज दराने व्याज दिला. तरी देखील या खासगी सावकार महिलेने आणखीन दीड लाख रुपये देणे बाकी आहेत, असा तगादा लावत त्रास दिला. दरम्यान, या तिन्ही खासगी सावकारांनी राजश्री निराळे यांना व्याजासाठी तिच्या घरी, कामाच्या ठिकाणी जाऊन व्याज व मुद्दल देण्याची मागणी केली. पैसे न दिल्यास पतीला, मुलाला मारण्याची धमकी दिली, असा आरोपही राजश्री यांनी केला. शेवटी व्याज देऊन कंटाळलेल्या राजश्री यांनी 18 ऑगस्टला जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. याबाबत अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक दाईगडे करत आहेत.