सोलापूर- शहरात आतापर्यंत जे मृत्यू झाले आहेत, ते सर्व ज्येष्ठ नागरिकांचे आहेत. त्यामुळे पुढील काळात सोलापुरातील ज्येष्ठ नागरिकांवर लक्ष केंद्रीत करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली आहे.
सोलापूर शहरात सुमारे 50 हजार व्यक्ती ज्येष्ठ नागरिक आहेत. या ज्येष्ठ नागरिकांना कोणता ना कोणता आजार आहे. या ज्येष्ठ नागरिकांवरच जास्त लक्ष केंद्रीत करण्यात येत असल्याचेही जिल्हाधिकारी म्हणाले. 40 हजार पेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिकांची माहिती ही सोलापूर महापालिकेला देण्यात आलेली आहे. सोलापूर शहरातील 314 रेशन दुकानाच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार 15 हजारापेक्षा जास्त लोक हे 55 वर्षावरील आहेत. तसेच विडी कामगारांच्या रूग्णालयातून मिळालेल्या माहितीनुसार शहरातील विडी कामगारांमध्ये देखील 12 हजार हे ज्येष्ठ नागरिक असून त्यांना वेगवेगळे आजार आहेत. तसेच इंडियन मेडिकल असोसिएशनने दिलेल्या माहितीमध्ये देखील ज्येष्ठ नागरिक आणि त्यांना असलेले आजार या संबंधीची माहिती एकत्रीत करून ती महापालिकेला देण्यात आली आहे.