सोलापूर-शहरातील खाजगी दवाखाने बंद ठेवण्यात आल्यामुळे रुग्णांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. जिल्हा प्रशासनाने आदेश देऊनही अनेक खासगी रुग्णालय बंद ठेवण्यात येत असल्याच्या तक्रारी येत असल्यामुळे सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी तपासणीसाठी पथकाची नियूक्ती केली आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी विविध प्रतिबंधात्मक उपाय राबविण्यास सुरुवात केली आहे. त्यातील एक भाग म्हणून सोलापूर शहरातील सर्व नोंदणीकृत खासगी रुग्णालयांची तपासणी करण्यासाठी पाच जणांच्या एका विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या शहरातील काही खासगी रुग्णालय व दवाखाने बंद असल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे कोरोना आजारांचे रुग्ण वगळून इतर आजारी रुग्णांना उपचार मिळण्यास अडचण निर्माण होत होत्या. त्याचा भार शासकीय रुग्णालयांवर वाढत होता.
जिल्हाधिकारी नियुक्त विशेष पथक अपघात, प्रसूती, मधुमेह, किडनीचा आजार, हृदयविकार, मणक्यांचे, हाडांचे आजार, पॅरालिसीस इत्यादी रुग्णांना खासगी रुग्णालयात उपचार न करता इतरत्र जाण्यास सांगण्यात आले होते. शहरात स्त्रीरोग व प्रसुती रुग्णालय बंद असल्याने आरोग्यसेवा देण्यात अडथळा होत होता. त्यामुळे शहरातील सर्व नोंदणीकृत खासगी रुग्णालय, मान्यताप्राप्त वैद्यकीय व्यवसायिक, औषधे दुकाने आणि संबंधित आरोग्यविषयक खासगी आस्थापना सुरू आहेत का नाहीत, त्यांच्याकडे दाखल होणाऱ्या रुग्णांसाठी किंवा ज्या रुग्णांना वैद्यकीय सेवेची गरज आहे, त्यांना खासगी रुग्णालये वैद्यकीय सुविधा देत आहेत का नाहीत, याची सविस्तर तपासणी करणे आवश्यक होते. यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली पाच जणांचे पथक नियुक्त केला असल्याचा आदेश दिला आहे.
उज्वला सोरटे पथक प्रमुख
मंद्रूपच्या अप्पर तहसीलदार उज्वला सोरटे या तपासणी पथकाच्या प्रमुख आहेत. डॉ. ज्ञानेश्वर सोडल, वैद्यकीय अधिकारी सोलापूर महानगरपालिका, परदेशीमठ, नायब तहसीलदार, मंगळवेढा, श्रीराम कुलकर्णी, परवाना अधीक्षक सोलापूर महानगरपालिका व तुकाराम घाडगे सपोनि, आर्थिक गुन्हे शाखा यांची सदस्य म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.