सोलापूर : आषाढी वारीसाठी राज्यभरातून लाखो वारकरी भाविक येतात. त्यांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही, यासाठी जिल्हा प्रशासनाला नियोजनबद्ध व शिस्तबद्ध तयारी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वारकरी भाविकांच्या सोयी सुविधांसाठी निधीची कसलीही कमतरता भासू देणार नाही, अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूर येथे रविवारी दिली. पाहणी दौरा दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काही अधिकाऱ्यावर संतापले होते.
पंढरपूर दौऱ्याची चर्चा : यंदाच्या आषाढी एकादशीच्या सोहळ्यास प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू असून तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव हे त्यांच्या संपूर्ण मंत्रिमंडळासह विठूरायाच्या दर्शनासाठी येत आहेत. राव हे उद्या पंढरपूर येथे दाखल होणार आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आषाढी वारीच्या महापूजेसाठी 28 जून रोजी पंढरपूरमध्ये येणार होते. तेव्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या अगोदर तेलंगणाचे मुख्यमंत्री पंढरपुरात दाखल अशी चर्चा नागरिकांमध्ये होत असताना मुख्यमंत्री पंढरपूरमध्ये दाखल झाले. काल नांदेड येथील कार्यक्रम आटपून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक सोलापूर मार्गे पंढरपूरला आल्याने तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या अगोदर एकनाथ शिंदे हे पंढरपुरात दाखल झाले.
यात्रेची पाहणी : यात्रेपूर्वी पाहणी करणारे आणि वारकरी भाविकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणणारे पहिले मुख्यमंत्री होण्याचा मान एकनाथ शिंदे यांना मिळाला आहे. आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी पंढरपूर येथील विविध ठिकाणी भेट दिली. आषाढी यात्रेची पूर्व तयारीची पाहणी करून आढावा घेतला. यावेळी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. दरम्यान यावेळी मुख्यमंत्र्यांनी गोपाळपूर येथील महाआरोग्य शिबिर, पत्रा शेड, श्री विठ्ठल - रूक्मिणी मंदिर, 65 एकर या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. पाहणी केल्यानंतर त्यांनी विठ्ठल रूक्मिणीचे दर्शन घेतले.